नाशिक (Nashik) : अंजनेरी ते ब्रह्मगिरी दरम्यान रोपवे (Rope Way) उभारण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला असतानाच आता या ३७६ कोटींच्या प्रकल्पास त्रिंबक किल्ल्यावरील मेटघर ग्रामपंचायतीने विरोध केला आहे. मेटघर ग्रामपंचायतीने ग्रामसभेत या रोपवेविरोधात ठराव मंजूर केला. यामुळे प्रस्तावित रोपवेविरोधातील आंदोलनाला बळ प्राप्त झाले आहे.
खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून अंजनेरी ते ब्रह्मगिरी दरम्यान रोपवे उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या रोपवेसाठी ३७६ कोटी रुपये निधी मंजूर झाला असून हा प्रकल्प उभारण्यासाठी टेंडर प्रसिद्ध कऱण्यात आले आहे. या टेंडरची मुदत ३१ जुलैपर्यंत असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी मागील महिन्यांत दिल्यानंतर पर्यावरण प्रेमींकडून या प्रकल्पाविरोधात प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
या प्रकल्पामुळे जटायूंचा अधिवास, अंजनेरीची जैवविविधता, ब्रह्मगिरीची पवित्रता धोक्यात येणार असल्याची नाशिक त्र्यंबकेश्वरमधील सर्व पर्यावरण संस्थांची भूमिका आहे. या प्रकल्पाविरोधात त्याविरोधात पर्यावरणप्रेमींनी वनमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, हा विषय पर्यावरण मंत्रालयाचा नाही, तर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा असल्याचे सांगून त्यांनी हस्तक्षेपास नकार दिला.
दरम्यान, त्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत बैठक घेण्याच्या सूचना देत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतरही पर्यावरणप्रेमींचा विरोध वाढतच आहे. दरम्यान अंजनेरी ते ब्रह्मगिरी दरम्यान जिल्ह्यात अंजनेरी - ब्रह्मगिरी अथवा मार्कंडेय ते धोडप किल्ल्यावरील प्रस्तावित रोपवे असो, जिल्ह्यातील कुठल्याही गड- किल्ल्यांवर रोपवेची आवश्यकता अजिबात नाही. यामुळे राज्य व केंद्र सरकारने असे प्रस्ताव मंजूर करू नये, असा ठराव राज्याच्या पर्यटन, सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून मागील वर्षी गठित करण्यात आलेल्या गड संवर्धन समिती व सांस्कृतिक धोरण उपसमितीच्या सदस्यांनी केला आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मगिरीतथा त्रिंबक किल्ल्यावरील मेटघर ग्रामस्थांनी रोपवे विरोधात ठराव केला आहे. असा ठराव करण्याची या ग्रामपंचायतीची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ९ ऑगस्ट २०२२ रोजी मेटघर ग्रामपंचायतीने या रोपवे विरोधात ठराव केला होता. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी जटायू गिधाड पक्षाचे महत्त्व सांगणारे उपक्रम सुरू केला आहे.
दरम्यान, खोरीपाडा येथील जैवविविधता व गिधाड संवर्धनासाठी प्रसिद्ध पुरस्कारप्राप्त शंकर बाबा शिंदे यांनी ग्रामस्थ, पर्यावरण प्रेमींना मार्गदर्शन करताना आयुर्वेदिक दुर्मिळ औषधी वनस्पती संवर्धनासाठी, जटायू पक्षांच्या सेवेसाठी शासनाकडून राष्ट्रपती पुरस्कार दिला जात असतानाच रोपवे उभारून गिधाडे उध्वस्त केली जात असल्याची खंत व्यक्त केली. त्याचवेळी या विरोधाला न जुमानता प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास पुरस्कार परत करण्याचा इशारा त्यांनी दिला.
वन्यजीव अभ्यासक जयेश पाटील यांनी अन्नसाखळीतील गिधाडांचे महत्त्व सांगून रायगड येथील रोपवेमुळे तेथील गिधाड नामशेष झाल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. यामुळे तेथील अनुभव लक्षात घेऊन अंजनेरी ते ब्रह्मगिरी येथील रोपवेबाबत सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी केली. तसेच अनावश्यक रोपवेऐवजी येथील निसर्ग संपदेच्या रक्षणासाठी १०० कोटी रुपये सरकारने पर्यावरण विकासासाठी द्यावेत. बदलते हवामान लक्षात येथील बोडक्या डोंगराचे जैवविविधतेने संपन्न भारतीय वृक्षराजीने हरितकरणासाठी द्यावेत, अशी भावना पर्यावरणप्रेमीनी मांडल्या.