नाशिक (Nashik) : दिंडोरी तालुक्यातील अक्राळे औद्योगिक वसाहतीमध्ये (Akrole MIDC) वर्षभरात रिलायन्स लाईफ सायन्सेस (Reliance Life Sciences) व इंडियन ऑईल कॉर्पेारेशन (IOC) यांनी गुंतवणूक केल्यानंतर आता इतर जवळपास २९ उद्योगांनी तेथे गुंतवणूक केली आहे. यामुळे अक्राळे औद्योगिक वसाहतीमध्ये आतापर्यंत ५,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, त्या माध्यमातून ४,१९६ जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होऊ शकणार असल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी दिली.
नाशिकमधील सातपूर आणि अंबड या दोन औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगांसाठी सध्या जागा उपलब्ध नाही. यामुळे भविष्याचा वेध घेत एमआयडीसीने नाशिकपासून अवघ्या १७ किलोमीटर अंतरावर दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभारली आहे.
रिलायन्स लाइफ सायन्सेस या रिलायन्स उद्योग समूहाच्या कंपनीने येथे कोव्हिड १९ च्या काळात बाराशे कोटी रुपये गुंतवण्याचा सामंजस्य करार केला. अलिकडच्या काळात नाशिकमध्ये आलेला हा सर्वात मोठा उद्योग आहे.
या उद्योगासाठी महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीने अक्राळेत १६० एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर इंडियन ऑईल कॉर्पेारेशननेही अक्राळेत ३५० कोटींची गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठीही एमआयडीसीने ६० एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या दोन मोठ्या उद्योगांच्या गुंतवणुकीमुळे अक्राळे हे उद्योगांसाठी एक आकर्षण केंद्र झाले आहे.
यातून या दोन उद्योगांव्यतिरिक्त २९ लहान मोठ्या उद्योगांनी येथे गुंतवणूक केली आहे. यामुळे केवळ वर्षभरात अक्राळे येथे ५७०० कोटींची गुंतवणूक झाली आहे. या उद्योगांमुळे अक्राळे औद्योगिक वसाहतीमध्ये ४ हजार १९६ नवे रोजगार तरुणांना उपलब्ध होणार आहेत.
अक्राळेतील प्रमुख गुंतवणूकदार उद्योग
रिलायन्स लाइफ सायन्सेस- १२०६ कोटी
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन- ३५० कोटी
प्लान्सस्केअर प्रोकॉन प्रा. लिमिटेड- ९२५ कोटी
राज इंडस्ट्रीज - १६५ कोटी
जोगेश्वरी एंटरप्रायझेस- १२० कोटी
श्री महालक्ष्मी इंडस्ट्रीज- १४५ कोटी
पाटील प्लास्ट- ४०५ कोटी
तिरूपती इंजिनिअरिंग- २०० कोटी
मोटेक्स ग्लास फायबर लिमिटेड- ५० कोटी
जय अरावली इंडस्ट्रियल प्रॉडक्टस् - ५७.२७ कोटी