नाशिक (Nashik) : सिंहस्थ कुंभमेळा पाच वर्षावर आल्यामुळे प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. मात्र, कुंभमेळ्यातील सर्वात महत्वाचे आकर्षण असलेले साधूग्राम वगळता इतर गोष्टीवरच भर दिला जात आहे. साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा मिळवण्याऐवजी इतर विकास कामांचा समावेश करून सिंहस्थाचे बजेट फुगवण्यावर भर दिला जात असल्याची टीका होऊ लागली आहे.
मागील सिंहस्थात साधुग्रामसाठी कायमस्वरूपी भूसंपादनावर भरपूर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या जमिनी भाडे पट्ट्याने घेऊन त्यावर सुविधा उभारल्या जात असल्याने त्या नापिक होऊन जातात. यामुळे महापालिकेने त्या ताब्यात घेऊन मोबदला द्यावा, अशी शेतकऱ्यांचीही भावना होती. मात्र, निधी नसल्याचे कारण देऊन एफएसआय चे गाजर शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. यामुळे भूसंपादन रखडले. मात्र, त्यानंतर महापालिकेने दोन वर्षांत सुमारे साडेसातशे कोटींचे भूसंपादन केले. त्यासाठी बँकेतील ठेवी आणि कोरोनाचा निधी वळविला. पण या सगळ्यात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या साधुग्रामसाठीचे भूसंपादन विषयाकडे मात्र ढुंकूनही पाहिले नाही. सोयीचे तेवढे करायचे, या प्रकाराने साधुग्राम ओसाड आहे. या साधुग्रामसाठी भूसंपादन केले नाही व शेतकऱ्यांनी जमिनी भाडेतत्वावर देण्यास प्रतिसाद दिला नाही, तर साधू- महंतासाठी साधुग्राम कोठे उभारणार याचा कोणीही विचार करीत असल्याचे दिसत नाही.
साधुग्रामची फक्त चर्चा
साधुग्रामसाठी सिंहस्थात मोठ्या प्रमाणावर सुविधा उभारल्या गेल्या. मात्र त्यानंतर साधुग्राम भागातील सोयीसुविधा दूरच, पण कायमस्वरूपी साधुग्राम संपादनाचा विषय आठ वर्षांत मार्गी लागला नाही. भूसंपादनाची केवळ चर्चा होते. शेतकऱ्यांची आंदोलन होतात. मंत्रालयात दौरे होतात. पण कायमस्वरूपी भूसंपादन मात्र होतच नाही.
बजेट फुगवा फुगव
सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळतो. स्थानिक पायाभूत सोयीसुविधांचे जाळे मजबूत करण्यासाठी हा निधी उपयोगी ठरतो. पण अलीकडे काही वर्षांपासून या निधीवर डोळा ठेवून निधी ओढण्यासाठी नियोजन फुगवाफुगवी पाहायला मिळत आहे. गेल्यावेळी एक कोटी भाविक येतील, असा अंदाज वर्तवतांना गोदावरीच्या दुतर्फा घाट उभारले गेले. त्या घाटांचा सिंहस्थात व नंतरही काहीही उपयोग झाला नाही. उलट सुमार दर्जाच्या बांधकामांमुळे गोदावरी किनारे बकाल दिसत आहेत. आता सिंहस्थ पर्वणीची पूर्वतयारी सुरू झाली असून सध्याही अनेक कामांची घुसखोरीचे प्रयत्न सुरू झाले आहे. सार्वजनिक लोकहितापेक्षा सत्तेतील प्रस्थापित राजकारण्याच्या हिताचे विषय घुसवत बजेट फुगवाफुगवीत रस घेण्याचे नियोजन सुरू झाले आहे. या आणि अशा प्रकारामुळे कायमस्वरूपी साधुग्राम, नदीस्वच्छतेसारखे विषय आणि उपायांना स्थान मिळेल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.
कोट्यवधीचे भूसंपादन करताना वर्षानुवर्षापासून जमिनी अडकलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पाने पुसले गेले. साधुग्रामसाठी जागा जाणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून तिष्ठत ठेवले जाते; पण इतरांना मात्र विनातिष्ठता भूसंपादनाचे मोबदले दिले जातात. सिंहस्थाचे नियोजन करताना नाशिककर नागरिकांच्या प्राधान्याला आणि सार्वजनिकहिताला महत्त्व दिले जावे.
- समाधान जेजुरकर, साधुग्रामबाधित शेतकरी