नाशिक (Nashik) : मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी (Mobile service provider) केलेल्या मागणीनुसार नाशिक शहरात आणखी ५०० टॉवर (Mobile Tower) उभारण्याची गरज आहे. यामुळे नाशिक महापालिकेने राज्यातील इतर महापालिकांप्रमाणे उत्पन्न वाढीसाठी मोबाईल कंपन्यांना टॉवर उभारण्यासाठी महापालिकेच्या जागा भाडे तत्त्वावर देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
महापालिकेने केलेल्या अंदाजनुसार मोबाईल टॉवर उभारण्यास जागा दिल्यास वर्षाला ३६ कोटी रुपये उत्पन्न मिळू शकणार आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बुधवारी (ता. १३) महापालिकेत बैठक होणार आहे.
मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी महापालिकेकडे नोंदवलेल्या माहितीनुसार शहरात सुमारे बाराशे मोबाईल टॉवरची आवश्यकता आहे. सध्या शहरातील खासगी इमारतींवर ७०० टॉवर उभे आहेत. यामुळे शहरात आणखी पाचशे टॉवर नव्याने उभारले जाणार आहेत. त्यापैकी किमान ३०० टॉवर महापालिकेच्या जागांवर उभे राहिल्यास महापालिकेच्या उत्पन्नात महिन्याला तीन कोटी रुपयांची भर पडणार आहे, असे कर विभागाचे म्हणणे आहे.
राज्यात महापालिकांच्या जागा मोबाईल टॉवरसाठी भाडेतत्वाने दिल्यामुळे ठाणे व मुंबई या महापालिकांना कोट्यवधी रुपयांचा कर मिळतो. तसेच छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे येथील महापालिकांनी हा प्रयोग राबवला आहे. नागपूर येथील महापालिका या निर्णयामुळे फायद्यात राहिली आहे.
यामुळे नाशिक महापालिकेच्या जागा, इमारती, वाचनालये, सांस्कृतिक भवन आदी ठिकाणी हे टॉवर उभारण्यास महापालिका परवानगी देणार आहे. यामुळे या जागा शोधून त्यांची निवड करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये विविध विभागांचे अधिकारी आहेत. ही समिती पंधरा दिवसांच्या आत अहवाल सादर करणार आहे.
या समितीची पहिली बैठक बुधवारी (ता. १३) महापालिकेत होणार आहे. बैठकीत जागा उपलब्धता, भाडे आकारणी, करार आदी विषयांवर चर्चा होणार आहे.