नाशिक (Nashik) : नाशिक येथील छत्रपती संभाजीनगर मार्गावर नांदूर नाकापाठोपाठ आता मिरची चौकातही उड्डाणपूल उभारण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये ५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मागील वर्षी मिरची हॉटेल चौकात झालेल्या भीषण अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी मिरची हॉटेल चौक व नांदूरनाका चौक येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली होती. या दोन्ही उड्डाणपुलांमुळे छत्रपती संभाजीनगर मार्गावरील महापालिका हद्दीतील वाहतूक सुरळीत होणार आहे.
नाशिक महापालिका हद्दीत मागील वर्षी ८ ऑक्टोंबरला छत्रपती संभाजीनगर मार्गावर हॉटेल मिरची चौकात खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला होता. त्यात बसला लागलल्या आगीत १३ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.
या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत अपघाताची कारणे शोधण्याबरोबरच ब्लॅक स्पॉट शोधून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने संयुक्त सर्वेक्षण केले. त्यात महापालिका हद्दीमध्ये अपघाताचे २६ ब्लॅक स्पॉट आढळले. त्यातील केवळ हॉटेल मिर्ची चौकातील ब्लॅक स्पॉट निवारणासाठी कामे केले असून, अद्यापही शहरातील उर्वरित ब्लॅक स्पॉट निर्मूलनाचे काम झालेले नाही.
दरम्यान छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतूक कोंडी नित्याची आहे. त्यात लग्नसराईमध्ये हे प्रमाण खूप मोठे असते. यामुळे नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार अॅड. ढिकले यांनी नांदूर नाका येथे उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. तो उड्डाणपूल राज्य सरकारने मंजूर केला आहे.
विधिमंडळ अधिवेशनात सरकारने ५५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या असून त्यात मिरची हॉटेल चौकातील उड्डाणपुलासाठी ५० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यामुळे नाशिक महापालिका हद्दीत छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.