नाशिक (Nashik) : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडून क्रीडा साहित्यासाठी एक कोटी साठ लाखांचे कंत्राट मिळवून त्यापैकी २७ लाखांचेच साहित्य पुरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाने निर्मल सोल्युशन्स या कंपनीविरोधात तक्रार दिली असून, भद्रकाली पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. क्रीडा विभागाच्या कार्यालयात दोन दिवसांत दहा कोटींच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून या विभागांमधील टेंडर प्रक्रियेतील अनियमितता यानिमित्ताने समोर आली आहे.
आमदार प्रवीण दटके यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास ६ मार्च २०२३ रोजी पत्र देऊन क्रीडा आणि व्यायाम साहित्य पुरवठादार मे. सॅमसन इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड यांनी पुरवलेल्या साहित्य आणि रकमेबाबत माहिती मागितली होती. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने आमदार दटके यांना दिलेल्या माहितीनुसार या पुरवठादाराने २०१७-१८ वर्षात केवळ १७ लाख रकमेचे साहित्य पुरवठा केल्याचे समोर आले.
या पुरवठादाराने नाशिक जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयास ९ कोटी २३ लाखांचे क्रीडासाहित्य पुरवल्याचे या कार्यालयाचे प्रमाणपत्र टेंडरसोबत जोडले होते. यातून बनावट प्रमाणपत्र जोडल्याचे समोर आल्यामुळे जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात 'सॅमसन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक' या कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
या धक्कादायक प्रकारानंतर नाशिक जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात तीन-चार वर्षांपूर्वी रुजू असलेले तत्कालीन प्रभारी क्रीडाधिकारी यांनीही निर्मल सोल्युशन या क्रीडासाहित्य पुरवठादाराविरुद्ध अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र सादर करणे आणि शासकीय मुद्रेचा गैरवापर करणे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्याकडून २०१९-२० वर्षात क्रीडा साहित्य पुरवठा संदर्भात टेंडर प्रसिद्ध केले होते.
यावेळी निर्मल सोल्युशन्स यांनी १ कोटी ६० लाखांचे अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. प्रत्यक्षात त्यांच्याकडून २७ लाख ९५ हजार ९५१ रकमेचे साहित्य पुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून उपसंचालक क्रीडा व युवकसेवा संभाजीनगर यांना सादर करण्यात आली.
त्याचप्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या २०२०-२१ वर्षातील ऑनलाइन टेंडरमध्येही पुरवठादाराने २ कोटी ६० लाखांचे बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर केल्याची माहिती उपसंचालक यांच्या चौकशीत उघड झाली.
त्यानुसार त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास संबंधित पुरवठादाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेशित केल्याने तत्कालीन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी निर्मल सोल्युशन पुरवठादार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
एकाच विभागात एकाच वेळी टेंडर मिळवण्यासाठी अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र सादर करणारे पुरवठादार उघडकीस आल्यामुळे क्रीडा साहित्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास यात बनावट प्रमाणपत्र सादर करणारे सर्वच पुरवठादारांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.