नाशिक (Nashik) : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा टप्पा दोन सुरू झाला असून, जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी जागा उपलब्धतेचे ७५ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे महावितरणला एक हजार ३७० हेक्टर जमीन उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नव्याने ४३३ जागा उपलब्धतेचे प्रस्ताव सादर झाले आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा दोन राज्य सरकारने जाहीर केला असून त्यातून राज्यात ७ हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यात ३० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. सौरऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी जागेबरोबर शेतकऱ्यांकडूनही भाडेपट्ट्याने जमिनी घेतल्या जात आहेत. यासाठी ग्रामीण भागातून प्रस्तावही मागविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात ७५ प्रस्ताव मंजूर झाले असून, त्यातून महावितरणला सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी एक हजार ३७० हेक्टर सरकारी जागा उपलब्ध होणार आहे.
पहिल्या टप्प्यात जागा जागा उपलब्धतेचे सादर झालेल्या १२१ प्रस्तावांपैकी जिल्हा प्रशासनाने ७५ प्रस्ताव मंजूर झाले असून, दुसऱ्या टप्प्यासाठी आता नव्याने ४३३ जागा उपलब्ध करण्याचे प्रस्ताव सादर झाले आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजना
- सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी वार्षिक १२५००० रुपये भाडे मिळणार.
- जमीन २५ वर्षांसाठी भाडेपट्ट्याने द्यावी लागणार
- वार्षिक भाडेपट्ट्यात दरवर्षी तीन टक्के वाढ केली जाणार
- शेतकऱ्यांची जमीन सध्याच्या विद्युत उपकेद्रापासून पाच किलोमीटरच्या आत असणे बंधनकारक
- सौरऊर्जा प्रकल्प असणाऱ्या ग्रामपंचातींना एका प्रकल्पामागे पाच लाख रुपये निधी दिला जाणार
- योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरणच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार
तालुकानिहाय मंजूर प्रस्ताव
नाशिक : ७
इगतपुरी : ५
दिंडोरी : 2
त्र्यंबकेश्वर : २
निफाड : ३
सिन्नर : १३
येवला : १
मालेगाव : ७
कळवण : २
देवळा : ६
बागलाण : ११
चांदवड : ९
नांदगाव : २
सुरगाणा : ३