नाशिक (Nashik) : नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १०८६ मजूर सहकारी संस्थांचा जिल्हा संघ असलेल्या नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ४ डिसेंबरला मतदान होणार आहे. जिल्हा परिषद, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग यांच्या माध्यमातून होणाऱ्या दहा लाख रुपयांच्या आतील कामांपैकी ३५ टक्के कामे मजूर संस्थांना दिली जातात. यामुळे जिल्हा मजूर सहकारी संघाची निवडणूक जिल्ह्यातील विकास कामांच्य दृष्टीनेही महत्त्वाची आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे १०८६ मजूर संस्थांची नोंदणी झालेली असून, या सर्व संस्थांनी मिळून नाशिक जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ स्थापन केला आहे. या मजूर संस्था सहकारी संघातर्फे मजूर संस्थांच्या समस्या सोडवणे, सर्व मजूर संस्थांना कामे मिळवून देण्यासाठी समन्वय साधणे, सरकार-दरबारी मजूर संस्थांचे प्रश्न मांडणे आदी कामे केली जातात. या बदल्यात जिल्हा मजूर सहकारी संघाला मजूर संस्थांकडून एक टक्के निधी दिला जातो. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण, जलसंपदा आदी विभागामध्ये बांधकामासाठी निघणाऱ्या दहा लाखांच्या आतील कामे विना टेंडर सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर संस्था यांना दिली जातात. या विभागामध्ये निघणाऱ्या दहा लाखांच्या आतील कामांपैकी ३५ टक्के कामे मजूर संस्थांना देणे बंधनकारक आहे. यामुळे जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांना दरवर्षी जवळपास पाच हजार कामे दिली जातात.
दरवर्षी चारशे ते पाचशे कोटींची कामे दरवर्षी केली जात असल्यामुळे नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघावर संचालक होण्यासाठी मोठी चढाओढ असते. नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांच्या प्रतिनिधींसह ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त, महिला या प्रवर्गातूनही संचालकांची निवड होत असते. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख ठेकेदारांकडे मजूर संस्था आहे. यामुळे मजूर संस्थांच्या सहकारी संघाची निवडणक अत्यंत चुरशीची होत असते व प्रतिष्ठेची केली जाते.