नाशिक (Nashik) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी २०१४ मध्ये घोषणा केलेल्या केलेल्या निफाड साखर कारखान्याच्या जागेतील ड्रायपोर्ट प्रकल्प गुंडाळला गेला असून त्याऐवजी या कारखान्याच्या १०० एकर जागेत मल्टी मॉडेल हब उभारले जाणार आहे. या मल्टीमॉडल हबच्या उभारणीसाठीच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाली असून लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर प्रकल्पाचे कामकाज सुरू होणार असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले. जेएनपीटी व एनएचआय यांच्यातर्फे ५०० कोटींची गुंतवणूक असलेला मल्टीमॉडेल हब हा प्रकल्प होणार आहे. हा प्रकल्प साकारल्यानंतर तेथून फळे, भाजीपाला, निर्यातीला मोठी संधी मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २०१४ मध्ये नाशिक येथे आल्यानंतर त्यांनी निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर ड्रायपोर्ट पकल्प उभारण्याची घोषणा केली होती. त्यावेळी नितीन गडकरी यांनी जेएनपीटीच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे नाशिक येथून होणाऱ्या निर्यातीला वेग मिळेल, असे सांगितले होते. तसेच या प्रकल्पासाठी निफाड सहकारी कारखान्याची जागा घेऊन त्या बदल्यात निफाड कारखान्याचे कर्ज फिटून कारखाना सुरळीत सुरू होईल, असेही जाहीर केले होते. त्यामुळे या प्रकल्पाबाबत निफाडसह नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना व निर्यातदारांना मोठी उत्सुकता आहे. मात्र, निफाड सहकारी साखर कारखान्याचा ताबा असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, निफाड कारखान्याकडे विक्री कर थकबाकी असल्याने राज्याचा विक्री कर विभाग व केंद्र सरकारचे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांच्या अधिकाऱ्यांमध्ये होणाऱ्या बैठका व त्यांच्या परस्परभिन्न भूमिका यामुळे यात बराच कालावधी गेला. तत्कालीन राज्य सरकारने निफाड कारखान्याचा विक्रीकर माफ करण्यास नकार दिल्याने हा प्रकल्प मागे पडला.
दरम्यान राज्यात सत्तांतर झाले व नितीन गडकरी यांच्याकडील बंदरांचे मत्रालय गेले. यामुळे या प्रकल्पासाठी पुन्हा नव्याने पाठपुरावा सुरू झाला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या प्रकल्पासाठी केंद्रीय पातळीवरून हव्या असलेल्या बाबी व राज्य सरकारशी संपर्क साधण्याचे काम केले, तरी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी वित्त मंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कारखान्यावरील विक्रीकराचा मुद्दा सोडवून घेतला. यामुळे या प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. दरम्यान नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निफाड कारखाना भाडेतत्वावर देण्याचाही निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून ड्रायपोर्ट ऐवजी मल्टी मॉडल हब हा नवीन प्रकल्प मंजूर करून घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून निफाड कारखान्याच्या १०० एकर जागेवर फळे, भाजीपाल्यासह इतर कृषीमालाच्या निर्यातील चालना मिळणार आहे. तसेच निफाड कारखान्याच्या १०० एकर जागेच्या मोबदल्यातून निफाड कारखान्याचा कर्जाचा बोजाही कमी होणार आहे. एकाच वेळी निफाड कारखाना सुरू होणे आणि निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी मल्टी मॉडल हबची सुविधा उपलब्ध होणे यामुळे निफाड, दिंडोरीसह इतर तालुक्यांमधील कृषीक्षेत्राला चालना मिळणार आहे.
श्रेयावरून वाद
हा प्रकल्प आपल्यामुळेच मार्गी लागल्याचे आमदार दिलीप बनकर यांनी म्हटल्याचे मध्यंतरी माध्यमांमध्ये आले होते. त्यावर डॉ. भारती पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमुळे विलंब झाल्याची टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली आहे. यामुळे हा प्रकल्प मार्गी लागत असताना त्याच्या श्रेयावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरवात झाली आहे.