मुंबई (Mumbai) : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते वडपे पर्यंतच्या महामार्गाची समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली. रस्ता मोठ्या प्रमाणात खराब असल्याने सोमवारपासून टोल घेणे बंद करा, अशी मागणी आमदार शेख यांनी केली आहे.
मुंबई ते नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीने गंभीर रूप धारण केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी महामार्गाची पाहणी करण्याचे ठरले होते. 10 दिवसात कोंडी न सुटल्यास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येईल तसेच डागडुजी होईपर्यंत टोल बंद करण्याचा प्रस्ताव सादर करा, अशी सूचना मंत्री पवार यांनी केली होती. त्यानुसार समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांचे समवेत एमएसआरडीसीचे संचालक अनिलकुमार गायकवाड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमन श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, ठाणे महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस अधीक्षक मनोहर दहीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुधीर तांबे, वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त विजय राठोड यांनी महामार्गाची पाहणी केली.
यासंदर्भात आमदार रईस शेख म्हणाले की, मुंबई ते नाशिक रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. रस्ता खराब असल्याने वाहतूक कोंडी होते आहे. प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. म्हणून सोमवारपासूनच या महामार्गावर आकारण्यात येणारा पथकर (टोल) बंद करावा, अशी मागणी केली आहे. महामार्गाची ड्रोनद्वारे आठवड्यातील 24 तास पाहणी करावी, वाहतूककोंडी संदर्भात डॅशबोर्ड तयार करावा, मुंबई प्रमाणे वॉर रूम स्थापना करावी, या मागण्या आमदार रईस शेख यांनी केल्या आहेत. आमदार शेख यांनी अधिकाऱ्यासमवेत रस्त्यावरील 'बॉटल नेक' ठिकाणाची पाहणी केली. पुढच्या 10 दिवसांमध्ये खराब रस्त्याची सुधारणा करावी, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मार्शल तैनात करावेत, वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत सुशिक्षित कार्यपद्धती (एसओपी) बनवण्यात यावी, आदी मागण्या आमदार रईस शेख यांनी केल्या आहेत.