नाशिक (Nashik) : नाशिक ते मुंबई सहापदरी महामार्ग काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून हे काम करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केली. तसेच सूरत-चेन्नई या १,६०० किलोमीटर अंतराच्या ग्रीन एक्सप्रेसचे ८० हजार कोटी रुपयांचे काम सुरु होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशातील प्रथम क्रमांकाचा निर्यात जिल्हा नाशिकला बनवित असताना नाशिक अपघातमुक्तही केले जाईल, असेही गडकरी यांनी आश्वस्त केले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.,आदी उपस्थित होते.
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या २२६ किलोमीटर लांबीच्या १ हजार ८३० कोटींच्या प्रकल्पांचा लोकार्पण आणि कोनशिला अनावरण सोहळा गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन झाला. यावेळी गडकरी म्हणाले, की मुंबई-नाशिक महामार्गाच्या निर्मितीनंतर तो समृद्धी महामार्गास पिंप्रीसदो इथे मिळणार असल्याने प्रवास सुखकर होईल. गोंदे ते पिंप्रीसदो फाटा या सहापदरी मार्गासाठी केंद्राने ८६६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याचे भूमीपूजन होत आहे. त्याचप्रमाणे नांदगाव ते मनमाडमध्ये २५३ कोटींचे काम झाले असून सूरत-नागपूर महामार्गाला जोडणारा हा रस्ता आहे. त्यातून नाशिक ते जळगावचा संपर्क सुधारणार आहे. याशिवाय १ हजार ५७७ कोटींच्या ७ कामांचे भूमीपूजन होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
नाशिकसाठी २ हजार १०० कोटींचा मेट्रो प्रकल्प मंजूर होईल, अशी ग्वाहीही नितीन गडकरी यांनी दिली. मेट्रोसाठी ‘इलिव्हेटेड कॉरीडॉर’ अंतर्गत नाशिक रोड ते द्वारका चौक या मार्गावरील नागपूरप्रमाणे डबल डेकरच्या सोळाशे कोटींच्या मार्गाला मंजुरी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.
भुजबळांच्या वक्तव्यावर राजकारण नाही
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक-मुंबई महामार्गाच्या सहा पदरी काँक्रिटीकरणाविषयी सतत मागणी केली आहे. हा धागा पकडून गडकरी यांनी मी भुजबळांना दोष देत नाही आणि मला राजकारण करायचे नाही, असे स्पष्ट केले. गडकरी म्हणाले, की भुजबळ हे बांधकाममंत्री असताना राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी करायला हवा होता. पण त्यात अडचणी जाणवल्या असतील. २०२६ पर्यंतचे काम असल्याने त्याची ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. याही अडचणी दूर केल्या जातील.