नाशिक (Nashik) : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या भूसंपादनाच्या दराला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. परिणामी भूसंपादन प्रक्रिया रखडली आहे. यामुळे केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी निवृत्त जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या दरांबाबत फेरविचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही समिती तीन महिन्यांत अहवाल सादर करणार असून त्यानंतर भूसंपादनाबाबत निर्णय होणार आहे.
सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नाशिक जिल्ह्यात सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नर या सहा तालुक्यांमधील ६९ गावांमधून जातो. यासाठी ९९६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून जिल्ह्यात या महामार्गाची लांबी १२२ किलोमीटर आहे. या महामार्गासाठी दिंडोरी तालुक्यातील रामशेज येथे हेक्टरी २८ लाख रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. या गावातील शेती खरेदी-व्रिकीचे दर एकराला ६५ लाख रुपये असताना सरकारने दिलेले दर अन्यायकारक असल्याने शेतकऱ्यांनी संघटीत होऊन या भूसंपदानाला विरोध केला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयात मागील महिन्यात दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक झाली.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी आता निवाडे होऊन दर जाहीर झाले असल्याने आमच्या स्तरावर या दरांमध्ये बदल करता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय रस्ते विकास व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन भूसंपादनाबाबतच्या शेतकर्यांची भूमिका कळवली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी खासदार शरद पवार यांनी निवृत्त जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या दरांबाबत समिती स्थापन करण्याची सूचना केली. केंद्रीयमंत्री गडकरी यांनी ही सूचना मान्य करीत समितीची घोषणा केली व ही समिती तीन महिन्यांत अहवाल सादर करेल, असेही जाहीर केले. यावेळी नाशिक जिल्ह्यासह नगर, उस्मानाबाद, सोलापूर येथील शेतकरीही उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे कोंडाजी आव्हाड, गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, अॅड. प्रकाश शिंदे, शेतकरी भाऊसाहेब गोहाड, किरण पिंगळे, विकास वामने, अनिल कांडेकर, दशरथ केदार, राजेश खांदवे, राजाराम कांडेकर, प्रकाश शिंदे, साहेबराव पिंगळे आदी उपस्थित होते.