नाशिक (Nashik) : मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक ते मुंबई दरम्यान या पावसाळ्यातही मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे. तसेच वाहतूक कोंडी मोठ्याप्रमाणावर होत आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठाणे ते वडपे हा रस्ता ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. लवकरच हा रस्ता वाहतूक कोंडीतून मुक्त होईल, असा दावा भुसे यांनी केला आहे.आमदार रईस शेख यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.
मागील वर्षीही पावसाळ्यात मुंबई-आग्रा महामार्गावर पावसाळ्यात प्रचंड खड्डे पडले होते. महामार्ग प्राधिकारणने पावसाळ्यात रस्ते बुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सलग तीन ते साडेतीन महिने सुरू असलेल्या पावसामुळे तात्पुरते खड्डे बुजवण्याच्या उपाययोजना कुचकामी ठरून वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अखेर पाऊस थांबल्यावर या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले. त्यामुळे जूनपर्यंत हा रस्ता प्रवासासाठी ठिकठाक होता. त्यात ठाणे- वडपे हा २१ किलोमीटर रस्त्याचे सध्या आठपदरी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे तेथे वाहतूक कोंडी होतीच. आता पावसामुळे नाशिक ते मुंबई दरम्यान संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहनांचा वेग मंदावला असून वडपे ते भिवंडी दरम्यान रस्ते कामामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात सांगितले की, भिवंडी येथे मोठ्या प्रमाणात गोदाम आहेत. यामुळे अवजड वाहनांची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. मार्गावर वाहनांच्या रांगा लागतात. यावर उपाय म्हणून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वडपे ते ठाणे हा रस्ता आठ पदरी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे १६ जून २०२१ रोजी हस्तांतरीत केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू असून, आतापर्यंत ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा रस्ता आठपदरी होणार आहे. या रस्त्याचे काम ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे भुसे यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी हा रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाल्याची टीका केली. या रस्त्यावरून आपणही दोन किलोमीटर पायी चालत गेल्याचे सांगितले. या मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून अवजड वाहनांना वेळ मर्यादा ठरवण्यात येईल, तसेच लहान वाहनांना व स्वतंत्र लेन उपलब्ध करून दिली जाईल, असे भुसे यांनी सांगितले.