मालेगाव (Malegaon) : एमआयएमचे (MIM) मालेगाव मध्य मतदार संघातील आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या आंदोलनानंतर मालेगाव महापालिकेने तातडीने कार्यवाही करीत जुना आग्रा महामार्गाच्या फेज तीनच्या दुरुस्तीसाठी 24 तासांच्या आत 20 कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.
मालेगाव शहरातील आग्रा महामार्गावरील देवीचा जुना मळा ते दरेगावपर्यंत रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. देवीच्या मळ्याजवळील रस्त्यावर गटारीचे पाणी येत असल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. खड्ड्यांमुळे अपघात होत होते. महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमच्या कार्यकत्यांनी गुरुवारी (ता. २०) रास्तारोको आंदोलन केले. मालेगाव शहरातून जाणाऱ्या जुना आग्रा रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाचे फेज-2 चे काम पूर्ण झाले. मात्र, फेज- 3 चे काम मंजूर होऊनही त्याबाबत काहीही कार्यवाही केली जात नव्हती. या रस्त्यावरुन वाहने चालवणे जिकरीचे झाले आहे. गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने अनेकदा रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त होते. विशेषतः मागील पंधरा ते वीस दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नागरिकांना खड्यात साचलेल्या गटारीच्या पाण्याचा सामना करावा लागत होता. आमदार मौलाना मुफ्ती यांनी कार्यकत्यांसह चार तास रास्तारोको आंदोलन केले.
आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या महापालिका आयुक्त गोसावी यांच्या अंगावर गरम चहा व गटारीचे पाणी फेकल्याने आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रकाराचा निषेध करत संबंधितांविरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याचवेळी रस्त्याचे काम मार्गी लावण्याच्या हालचाली रातोरात गतिमान झाल्या. आंदोलनस्थळी जेसीबी आणून रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला. तसेच दुसऱ्याच दिवशी महापालिकेने देवीचा मळा ते दरेगावपर्यंतच्या महापालिका निधीअंतर्गत कॉक्रीटीकरण व क्रॉस ड्रेन कामाचे २० कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.. या कामासाठी ठेकेदारांना 16 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन टेंडर भरता येतील. टेंडरचे तांत्रिक लिफाफ़े २२ नोव्हेंबरला उघडण्यात येणार आहेत. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर काम नऊ महिन्यांमध्ये पूर्ण करावे लागणार आहे.