Nashik : गटविकास अधिकाऱ्यांच्या बहिष्कारामुळे 5 हजार मजूर अडचणीत

Mnerga
MnergaTendernam
Published on

नाशिक (Nashik) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामकाजात बदल करून योजना अंमलबजावणी जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी राज्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी रोजगारहमी योजनेशी संबंधित कामांवर बहिष्कार टाकला आहे. परिणामी जिल्ह्यातील ५ हजार मजुरांची या आठवड्यात हजेरीपत्रक निर्गमित होऊ शकले नाही. यामुळे मजुरांना मजुरी मिळण्यास उशीर होऊ शकणार आहे. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल या सर्व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यावर तोडगा काढणार असल्याचे समजते.

Mnerga
खडी घोटाळा? 'शिंदेंच्या माणसाला खडीपुरवठ्याचे काम देण्यासाठीच...'

सरकारने रोजगार हमी योजना अंमलबजावणीबाबत काही बदल केले आहेत. त्यानुसार  ग्रामपंचायत स्तरावरील साप्ताहिक हजेरीपत्रके निर्गमित करणे आणि मजुरांची उपस्थिती पडताळणी करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपवली आहे. तसेच रोजगार हमीच्या कामांचे नियोजन करताना कुशल व अकुशल कामांचे ६०: ४० प्रमाण राखण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपवली आहे. सरकारच्या या नव्या बदलास गटविकास अधिकाऱ्यांचा विरोध आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हजेरीपत्रक निर्गमित करण्यासाठी  ग्रामपंचायत स्तरावरील नियमित यंत्रणा असूनही ती जबाबदारी गटविकास अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच तालुकास्तरावर मजुरांची उपस्थिती पडताळणी करणे गटविकास अधिकाऱ्यांना शक्य होणार नाही.

Mnerga
'टेंडरनामा'च्या मारुती कंदलेंना शोध पत्रकारिता पुरस्कार

नव्या बदलानुसार मोठ्या प्रमाणात निधी खर्चाची तरतूद असलेल्या या योजनेत गटविकास अधिकारी यांच्या अधिनस्त केवळ कंत्राटी अभियंते आणि मानधन तत्त्वावर काम करणारे रोजगार सेवक एवढीच यंत्रणा ठेवली आहे. यामुळे तालुकाभरातील रोजगार हमीच्या कामांचे पर्यवेक्षण एकट्या गटविकास अधिकाऱ्याला करणे अजिबात शक्य नाही. त्यामुळे भविष्यात या योजनेत स्थानिक पातळीवर काही चुका झाल्यास आपल्यावर कारवाई होऊ शकते, अशी असुरक्षिततेची राज्यभरातील गटविकास अधिकाऱ्यांत निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी १० एप्रिलपासून रोजगार हमीच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. रोजगार हमी योजनेच्या मजुरांची प्रत्येक गुरुवारी ऑनलाइन हजेरी पत्रक प्रणालीत अपलोड केले जाते.  त्याला गटविकास अधिकारी मान्यता देतात, त्यानंतर मजुरांच्या खात्यात मजुरीची रक्कम जमा होते. मात्र, सध्या गटविकास अधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकलेला असल्याने मजुरांच्या हजेरी पत्रकास मान्यता मिळू शकली नाही. परिणामी या एक आठवड्यात मजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला वेळेवर मिळू शकणार नाही, असे दिसत आहे.

Mnerga
Nashik : निधी पुनर्नियोजनाला ठाकरे गटाच्या आमदार दराडेंचाही आक्षेप

गटविकास अधिकाऱ्यांच्या वेतनातून कपात?

रोजगार हमी योजनेच्या मजुरांचे वेतन उशिरा झाल्यास त्याला जबाबदार अधिकाऱ्यांच्या वेतनातून कपात करून ते संबंधितांना देण्याचा नियम आहे. या आठवड्यात गटविकास अधिकाऱ्यांनी रोजगार हमी योजनेच्या मजुरांच्या हजेरी पत्रकास गुरुवार मान्यता दिली नाही. यामुळे वेतनास उशीर झाल्यास, ती रक्कम गटविकास अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात केली जाईल, असे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com