नाशिक (Nashik) : मनमाड (Manmad) ते जालना (Jalna) या ११३ किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण डिसेंबरअखेर होणार आहे. यामुळे नवीन वर्षामध्ये मनमाड ते जालना हा प्रवास अत्यंत वेगाने व विना अडथळा होऊ शकणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.
मागील काही वर्षांपासून रेल्वेमार्गाच्या सुधारणेकडे रेल्वेमंत्रालयाने विशेष लक्ष दिले आहे. त्यात सर्व रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण आणि दुहेही मार्ग याला विशेष प्राधान्य दिले जात आहे. मध्यरेल्वेवरील मनमाड हे प्रमुख जंक्शन असून तेथून दक्षिर मध्य रेल्वेमार्ग सुरू होऊन तो मराठवाड्याकडे जातो. मात्र, हा मार्ग एकेरी असून त्यावरून डिझेल इंजिन असलेल्या रेल्वेगाड्या धावत असतात. त्यामुळे मनमाडहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित असणे व रेल्वेगाड्यांचा वेग कमी असणे या वर्षानुवर्षांच्या समस्या आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मनमाड ते जालना व जालना ते नांदेड या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा विद्युतीकरणाचा ३५७ किलोमीटरचा प्रक्लप असून त्यासाठी रेल्वेमंत्रालयाने ४८४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यावर्षी मार्चमध्ये या कामास प्रारंभ झाला असून सध्या मनमाड ते जालना दरम्यान विद्युतीकरणाचे काम काम युद्धपातळीवर सुरू असून ते काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वेगाड्यांच्या वेगात वाढ होऊन या मार्गावरील प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होऊ शकणार आहे. रेल्वे मार्ग विद्युतीकरणाच्या कामामधून सध्या लासूल, दौलताबाद व संभाजीनगर या मार्गावरील विद्युतीकरणासाठी केबल टाकण्याचे काम सुरू आहे. संभाजीनगरपर्यंत विद्युत केबल टाकण्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.
मनमाड-जालना या मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, डिझेलवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनांमुळे वेग कमी असल्याने रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडून जाते. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. यामुळे रेल्वे मंत्रालयाने या मार्गावरील रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या ११३ किलोमीटर रेल्वेमार्गावर विद्युत केबल टाकण्याचे काम सुरू असून मनमाड संभाजीनगर मार्गावरील विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर प्रवाशी व मालवाहतूक रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे. तसेच मराठवाड्यातील नागरिकांना उत्तर महाराष्ट्र व मुंबई या औद्योगिक विकसित भागातील व्यापार व दळणवळण अधिक सुसह्य होणार आहे. दरम्यान मनमाड ते जालना हा रेल्वेमार्ग एकेरी आहे. हा रेल्वेमार्ग दुहेरी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तांत्रिक बाबींची पूर्तता करून त्यासाठी निधीही मंजूर केला आहे.