मालेगाव : रुग्णालयांच्या निविदा प्रसिद्धीपूर्वीच वादात

मालेगाव : रुग्णालयांच्या निविदा प्रसिद्धीपूर्वीच वादात
Published on

मालेगाव महापालिकेसाठी महत्त्वकांक्षी आणि शहरवासीयांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेला ऐतिहासिक वाडिया व अली अकबर रुग्णालयाची नूतनीकरण निविदा प्रसिद्ध होण्यापूर्वीच वादग्रस्त ठरली आहे. या निविदेत वाडिया रुग्णालयाच्या दर्शनी भागात व्यापारी गाळे काढण्याचे प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे वाडिया रुग्णालय हे पूर्णपणे आरोग्य व वैद्यकीय कारणासाठीच आरक्षित आहे. त्यामुळे या आरक्षणात बदल (मायनर मॉडिफिकेशन) करावा लागणार आहे. त्याला राज्याच्या नगररचना विभागाने मंजुरी दिल्यानंतरच व्यापारी गाळे बांधता येतील. आरक्षण बदल व अन्य कामकाजासाठी महापालिका ते मुंबईपर्यंत खर्च करावा लागणार आहे. त्यामुळेच नुतनीकरणाचा ठेकेदारही निविदा काढण्यापूर्वीच निश्‍चित झाल्याची चर्चा आहे.

वाडिया रुग्णालयाच्या नुतनीकरणासाठी तब्बल १७ कोटी रुपये; तर अली अकबर रुग्णालयाच्या नुतनीकरणासाठी १४ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. अली अकबर रुग्णालय पूर्व भागातील रुग्णांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. येथील रुग्णांची एकूण संख्या पाहता नूतनीकरणादरम्यान सुरुवातीला रुग्णालयाची इमारत बांधावी, नंतरच जुने रुग्णालय पाडावे आणि रुग्णालय परिसरातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेज यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी महापालिकेवर मोठा मोर्चाही नेला; मात्र अली अकबर रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणावर दुकानांचे अतिक्रमण असून ती दुकाने सत्ताधारी गटाच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावरून आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

दुसरीकडे, शंभराहून अधिक वर्षाचा इतिहास असलेले एन. एन. वाडिया रुग्णालय हे शहरासाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरले होते; मात्र कालांतराने कॅम्प, अली अकबर, जाफरनगर आदी भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आकाराला आली आणि परिसरातील नागरिकांची सोय झाली. दरम्यान सामान्य रुग्णालये अस्तित्वात आल्याने वाडियाकडील रुग्णसंख्या कमी झाली. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाचा ताण हलका झाला. पूर्वी शहर आणि परिसरातील अपघात, शवविच्छेदनासह इतर सर्व बाबींसाठी वाडियावरच अलबूंन राहावे लागत होते. आता हे रुग्णालय तसेच रुग्णालयाला खेटूनच असलेले शिवाजी टाऊन हॉल आणि उर्दू शाळेच्या इमारती पाडून भव्य चार मजली नवे रुग्णालय बांधण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर झाला. त्यासाठी १७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. वाडिया रुग्णालय अधिक सुसज्ज व अत्याधुनिक असणार आहे. त्यामुळे महासभेत केवळ वाडियाचा प्रस्ताव मंजूर झाला असताना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अली अकबर रुग्णालयाच्याही नूतनीकरणाचा घाट घातला जात आहे, असा आरोप करण्यात येत आहे.

आगामी नऊ महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ही कामे प्रतिष्ठेची केली आहेत; तर विरोधक या कामांच्या निविदांमधील तांत्रिक अडचणी, आरक्षण फेरबदल, आदी मुद्दे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच या दोन्ही महत्वाकांक्षी विकासकामांच्या निविदा प्रसिद्धीपूर्वीच वादात आल्याने महापालिकेचे बांधकाम विभाग, नगररचना विभाग यामध्ये गुरफटले आहेत. दरम्यान, या निविदा आठवडाभरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com