नाशिक (Nashik) : ‘साहेब’ की ‘दादा’ यापैकी कोणत्या गटात जायचे, याबाबत संभ्रमावस्थेत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे (Saroj Ahire) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गोटात जाण्याला पसंती दिली आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या मतदारसंघासाठी तब्बल ४० कोटींचा निधी मंजूर झाला. आमदार आहिरे यांनी तीनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
यापूर्वीच्या तिन्ही अधिवेशनात आमदार आहिरे यांना अवघा दहा कोटींचाच विकास निधी मिळाला होता. मात्र यंदाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चांगला निधी मिळाल्याचा दावा करीत त्यांनी अजित पवार गटात सहभागाचा निर्णय कसा योग्य आहे, याकडे लक्ष वेधले. या निर्णयामुळे मतदारसंघातील कामे मार्गी लावून अधिक आक्रमकपणे मतदारासमोर जाणे सोपे असल्याचे अहिरे यांनी सांगितले.
मंजूर निधीत दहा कोटी आदिवासी भागातील विकास कामांसाठी आहेत. तर २५ कोटीं हे मतदारसंघातील रस्ते, पूल, संरक्षक भिंत बांधणे तर उर्वरित ५ कोटी हे गिरणारे ग्रामीण रुग्णालया करिता निधी मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळावा. यासाठी आमदार आहिरे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
पहिल्याच दिवशी देवळाली मतदारसंघासाठी पुरवण्या मागण्या अंतर्गत ४० कोटी मंजूर झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते असल्याने देवळाली मतदारसंघात पुढच्या काही दिवसांमध्ये भरघोस निधी मिळण्याची शक्यता आहे. याद्वारे मोठया प्रमाणात विकासाची कामे मार्गी लागणार आहे.
- सरोज आहिरे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस