नाशिक (Nashik) : जिल्ह्यातील कळमुस्ते आणि चिमणपाडा या दोन वळण योजनांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने आता पश्चिमवाहिनी नद्यांचे दमणगंगा-पार खोऱ्यात वाहून जाणारे पाणी ७३५.१६ दलघफू इतके पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी जवळपास ५३१ कोटी रुपये खर्चाला मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. नाशिकसह मराठवाड्याला या पाण्याचा लाभ मिळणार आहे.
दमनगंगा, नार पार खोऱ्यातील अरबी समुद्रात वाहून पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी प्रवाही वळण योजनांद्वारे तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी ५ वळण योजनांचे प्रस्ताव या वित्त व नियोजनविभागाकडे मान्यतेसाठी २०१९ पासून पडून आहेत. यात एकूण २३ योजनांचे प्रस्ताव आहेत. त्यातील १४ प्रवाही यापूर्वीच पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित नऊ योजनांपैकी चार योजनांची कामे सुरू असून तर ५ योजनांचे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादरकेले आहेत. त्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते आणि दिंडोरीतील चिमणपाडा या दोन्ही योजनांना मंगळवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
मंजूर झालेल्या योजनांमध्ये कळमुस्ते ही योजना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आहे. कळमुस्ते शिवारातील डोंगरगाव (दुगारवाडी) गावाजवळील दमणगंगा खोऱ्यातील वाल नदीच्या स्थानिक नाल्यावर ही योजना साकारली जाणार आहे. या योजनेद्वारे खोऱ्यात १९.५४ दलघमी (६९०.१६ दलघफू) पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वळवलेल्या पाण्यापैकी १२७ दलघफू पाणी स्थानिक वापरासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. यासाठी ४९४.९८ कोटी खर्च येणार आहे. यासाठी. या प्रकल्पासाठी ३९.६ हेक्टर वनजमीन आणि ९.५ हेक्टर खासगी जमीन असे ४९.१० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. या उपलब्ध पाण्यातून १९८४ हेक्टर सिंचन क्षेत्राची पुनर्स्थापना करण्याचे नियोजन आहे. दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा या प्रवाही वळण योजनेतून ४५ दलघफू इतके पाणी गोदावरी खोऱ्यात उपलब्ध होणार आहे.या योजनेतून पार खोऱ्यातील पाणी गोदावरीत वळवण्यात येणार आहे. त्यासाठी ३६.४० कोटी रुपयये खर्च येणार आहे.