नाशिक (Nashik) : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार २.० योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यानी वेळापत्रक जाहीर केले आहे. नव्या वेळापत्रकानुसार २४ एप्रिलपासून शिवारफेरीला सुरुवात करायची असून ८ जूनपर्यंत सर्व कामांचे टेंडर प्रक्रिया पूर्ण कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या वेळापत्रकानुसार सोमवार (दि.२४) पासून जिल्ह्यातील २१० गावांमध्ये जलयुक्त शिवार २.० योजनेच्या शिवारफेरीचे काम सुरू होणार आहे.
राज्य सरकारने २०१५ ते २०१९ या काळात जलयुक्त शिवार योजनेतून २२ हजार ५९३ गावांमध्ये मृद व जलसंधारणाची ६ लाख ३२ हजार ८९६ कामे करून २० हजार ५४४ गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली आहेत. या कामांमुळे २७ लाख टीसीएम पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आल्या. यामुळे ही योजना अत्यंत लोकप्रिय झाली व राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा दिसून आला आहे. राज्यात भाजपच्या सहभागाचे सरकार पुन्हा आल्यानंतर जलयुक्त शिवाय अभियान २.० ही योजना पूर्वीप्रमाणेच सुरू करण्यात आली आहे. त्यात गावातील पाण्याचा ताळेबंद करून त्यानुसार मृद व जलसंधारण, पाण्याचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध करणे, पाण्याचा अतिवापर झालेल्या भागात भूजल पातळी वाढवणे ही कामे केली जाणार आहेत. यासाठी भूजल पातळी व अवर्षणग्रस्त भाग या निकषांवर गावांची निवड केली जाणार आहे.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सूचनेनुसार नाशिक जिल्हाधिकारी यांनी या योजनेसाठी नाशिक जिल्ह्यात २१० गावांची निवड केली आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आता सर्व जलसंधारण उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना पत्र पाठवून जलयुक्त शिवार योजना अंमलबजावणीचे वेळापत्रक दिले आहे. या पत्रानुसार सर्व संबंधित समिती सदस्यांनी २४ ते २७ एप्रिल या काळात त्यांच्या तालुक्यातील निवड झालेल्या गावांमध्ये शिवार फेरी करायची आहे. शिवारफेरी पूर्ण झाल्यानंतर २८ एप्रिल ते ३ मे या काळात गाव आराखडा तयार करणे, गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करून त्याला ग्रामसभेची मान्यता घेणे ही कामे पूर्ण करायची आहेत.
ग्रामसभेची मान्यता मिळाल्यानंतर तालुकास्तरीय समितीने ४ ते ७ मे या काळात गाव आराखड्याना मान्यता देऊन ते प्रस्ताव जिल्हा समितीकडे पाठवायचे आहे. जिल्हा समितीने ८ ते १० मे याकाळात या आराखड्याना मान्यता दिल्यानंतर जलसंधारण विभागाने ११ ते १७ मेपर्यंत या सर्व कामांचे अंदाजपत्रक तयार करून त्यांना १८ ते २५ मे या काळात तांत्रिक मान्यता द्यायच्या आहेत. कामांना तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर २६ मेपासून २९ मेपर्यंत या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. यानंतर जलसंधारण विभागाने ३० मे ते ५ जून या काळात टेंडर प्रसिद्ध करायचे आहेत. या टेंडरची स्वीकृती मुदत ६ ते ८ जून अशी असणार आहे. या1 वेळापत्रकाप्रमाणे सर्व2 कामे करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. यामुळे सोमवार (दि.२४) पासून जिल्ह्यातील २१० गावांमध्ये जलयुक्त शिवार २.० योजनेच्या शिवारफेरीचे काम सुरू होणार आहे.