नाशिक (Nashik) : नाशिकमध्ये शंभर एकरावर आयटी पार्क उभारण्याची घोषणा करतानाच एका मोठ्या कंपनीचे डाटा सेंटर नाशिकला उभारण्यात येईल, असेही उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी येथील उद्योजकांनाआश्वासन दिले आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंबड येथील उद्योजकांच्या बैठकीत विविध आश्वासने देतानाच मंत्रालयात विशेष बैठक घेण्याचेही आश्वासन दिले.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंबड औद्योगिक वसाहतीमधील आयमा सभागृहात जिल्ह्यातील सर्व उद्योजकांशी बैठक घेतली. यावेळी उद्योजकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. प्रत्येक समस्या सोडवण्याबाबत सकारात्मक भूमिका उद्योगमंत्र्यांनी घेतली. यावेळी त्यांनी उद्योजकांवर आकारला जाणारा दुहेरी फायर सेस रद्द करण्याच्या सूचना देत एकच कर आकारण्यात यावा, अशाही सूचना दिल्या. यावेळी उद्योगमंत्री म्हणाले, राज्यात डाटा सेंटर उभारण्यासाठी अनेक उद्योग रांगेत उभे आहेत. त्यातील एक डाटा सेंटर नाशिकमध्ये उभारण्यात येईल. तसेच नाशिक येथे शंभर एकर जागेवर आयटी पार्क उभारण्यासाठीही प्रयत्न केले जाण्याची घोषणा केली. नाशिकच्या कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी नाकि जिल्ह्याते कृषी उद्योगांच्या उभारणीचीही घोषणा त्यांनी यावेळी केली. ट्रक टर्मिनलसाठी एमआयडीसीच्य अधिकाऱ्यांनी जागा शोधावी किंवा नाशिकमध्ये जकात नाक्याजवळ जागा असेल, तर महापालिका आयुक्तांनी परवानगी द्यावी व ट्रक टर्मिनलचा प्रश्न सोडवावा, अशा सूचना उद्योगमंत्र्यांनी दिल्या.
सेझचा प्रश्न मार्गी लावणार
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात गेले पंधरा वर्षांपासून इंडियाबुल्सचा सेझ उभारला आहे. तेथे औष्णिक वीजनिर्मिती केंद्र उभारले आहे, पण त्यासाठी कोळसा वाहून नेण्याची सुविधा नसल्याने तो प्रकल्प सुरूच होऊ शकला नाही. यामुळे सिन्नरच्या सेझचा प्रश्न उद्योजकांनी बैठकीत मांडला. यावर सिन्नरच्या सेझचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. ते म्हणाले, सिन्नरच्या सेझच्या जागेवर नवीन प्रकल्प आणण्यासाठी निर्णय घेऊ. सिन्नरच्या सेझच्या जागेवर पायाभूत सुविधा उभारून ती उद्योगांना देण्याबाबत प्रयत्न केले जातील. दरम्यान नाशिकमधील उद्योगांबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात बुधवारी (दि. ७) पालकमंत्री दादा भुसे यांच्या दालनात बैठक घेतली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.