नाशिक (Nashik) : गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरात आयटी हब तयार व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या आयटी पार्कसाठी महापालिकेने मागील वर्षी आडगाव शिवारात आयटी पार्क उभारण्यासाठी साडेतीनशे एकर जागा उपलब्धही करून दिली. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी इगतपुरी तालुक्यातील राजूर बहुला येथील जागा सूचवल्याने एमआयडीसीने तसा प्रस्ताव तयार केला. त्यातच नाशिक येथे आलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिंडोरी तालुक्यातील अक्राळे एमआयडीसीतील १०० एकर जागा आयटी पार्कसाठी राखीव ठेवण्याची घोषणा केली. यामुळे अनेक वर्षांपासून केवळ चर्चेच्या पातळीवर असणारा आयटी जागेच्या मुद्यावरून चर्चेत आला आहे. परिणामी आयटी पार्क नेमका होणार कुठे, असा प्रश्न निर्माण झाला असून या जागांच्या निमित्ताने भाजप व शिवसेना यांच्या स्थानिक नेत्यांमधील सत्तास्पर्धा यानिमित्ताने समोर आली आहे.
नाशिक शहराजवळील आडगाव येथे सुमारे साडेतीनशे एकर खासगी जागेत आयटी पार्क उभारण्यासाठी माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी त्यांनी बोलावलेल्या परिषदेस उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही पायाभूत सुविधा देण्याचे आश्वासन नाशिकमधील आयटी परिषदेत दिले होते. मात्र, त्यानंतर महापालिकेतील प्रशासकीय राजवट आल्याने तो विषय मागे पडला. पुढे राज्यात सत्तांतर खासदार हेमंत गोडसे यांच्या सूचनेनुसार नाशिक-मुंबई मार्गावर इगतपुरी तालुक्यात राजूर बहुला परिसरात आयटी पार्कसाठी शंभर एकर जागा राखीव ठेवण्याचे पत्र एमआयडीसीने वरिष्ठ कार्यालयाला पाठवले होते. त्यानंतर मागील आठवड्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिंडोरी तालुक्यातील अक्राळे एमआयडीसीमधील शंकर एकर जागा आयटी पार्कसाठी राखीव ठेवण्याची घोषणा केली आहे. यामुळे आयटी पार्क नेमका कोठे होणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी नाशिक आयटी पार्कसाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार आडगाव शिवारातील आयटी पार्क नाशिक महापालिकेला तसेच शासनाला तोशीस लागू देणारा नाही. तेथे आयटी पार्कसाठी साडेतीनशे एकर जागा उपलब्ध असून दोन राष्ट्रीय महामार्ग शेजारून जात असून नाशिकचे ओझर विमानतळ अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरवर आहे. यामुळे आयटीपार्कसाठी आडगाची जागा सर्वोत्तम आहे. नाशिक शहरातील आयटी क्षेत्रातील उद्योजकांचीही आडगाव शिवारातील जागेला पसंत आहे.नाशिक पूर्व मतदारसंघातील भाजपचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्याच मतदार संघात आडगाव येत असल्याने त्यांनीही यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतरही उद्योग मंत्र्यांनी अक्राळे शिवारातील जागा आरक्षित ठेवण्याच्या घोषणा केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. या मागे शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांमधील स्थानिक पातळीवर महापाकिलेतील राजकारणातून सत्ता स्पर्धेमुळे उद्योगमंत्र्यांची दिशाभूल केली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामुळे नाशिकला आयटी पार्क प्रत्यक्ष सुरू होण्याबाबत कार्यवाही होण्यापेक्षा त्याच्या जागेसंबंधीचा वाद उफाळून आल्याचे दिसत आहे.