नाशिक (Nashik) : इंडिगो विमान कंपनी ओझर विमानतळावर सुरू असलेल्या विमानसेवेचा विस्तार करणार आहे. त्यांनी केलेल्या घोषनेनुसार एक जूनपासून नाशिकहुन इंदूर व हैदराबादसाठीही विमानसेवा सुरू केली जाणार आहे. त्याचप्रमाणे अहमदाबादसाठी आणखी एक विमानसेवा सुरू केली जाणार आहे. नाशिकहुन वेगवेगळ्या शहरांसाठी सुरू असलेल्या विमानसेवा अधूनमधून खंडित होत असताना नवीन विमानसेवेची घोषणा सकारात्मक मानली जात आहे.
नाशिकच्या ओझर विमानतळावरून सध्या 'इंडिगो'कडून गोवा, नागपूर व अहमदाबादसाठी रोज तर 'स्पाइसजेटकडून नवी दिल्लीसाठी आठवड्यातून तीनदा सेवा दिली जाते. या सर्व फेऱ्यांना उद्योग, धार्मिक व पर्यटन क्षेत्रातील प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. त्या पार्श्वभूमीवर 'इंडिगो ने सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक जूनपासून इंदूर, हैदराबाद व अहमदाबादसाठी विमान सेवा सुरू केली जाणार आहे. अहमदाबादसाठी सध्या सेवा सुरू आहे.
सध्याच्या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून रोज सरासरी ९० टक्क्यांहून अधिक प्रवाशी प्रवास करतात. यामुळे या मार्गावर आणखी एक विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय इंडिगो कंपनीने घेतला आहे. नवी दिल्ली व बेंगळुरूसाठी सेवा सुरू करण्याचाही 'इंडिगो' चा विचार असल्याचे समजते. इंडिगोची नवीदिल्ली विमानसेवा सुरू झाल्यानंतर नाशिकच्या प्रवाशांना नवी दिल्लीसाठी 'स्पाइसजेट व 'इंडिगो' असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत. तसेच 'स्पाइसजेट'नेही लवकरच हैदराबाद सेवा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाशिककरांना हैदराबादसाठीही दोन पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहेत.
सध्या इंडिगो कंपनीचे विमान दुपारी ३.४५ ला नाशिक येथून निघून सायंकाळी ५.२५ वाजता अहमदाबादला पोहोचते. आता नव्याने सुरू होणारे विमान सकाळी ८.३० ला अहमदाबाद येथून निघेल. ते ९.३० ला नाशिकला पोहोचेल. ते परतीच्या दिशेने ९.४५ ला उड्डाण करील व सकाळी १०.४५ ला अहमदाबाद येथे पोहोचेल. त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी, शिर्डी येथे जाणारे भाविक, व्यापारी, उद्योजक, पर्यटक, शहरात मोठ्या संख्येने असलेले गुजराथी बांधव आदींमुळे अहमदाबाद सेवेला उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे सांगितले जाते. नाशिकमध्ये यापूर्वीही टू जेट व एअर अलायन्स अशा दोन कंपन्यांकडून अहमदाबादसाठी सेवा दिली जात होती.