Nashik : त्र्यंबकेश्वर सिंहस्थ आराखड्यात 2300 कोटींचे रस्ते; 63 कोटींचे विश्रामगृह

Kumbh Mela
Kumbh MelaTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या तीन वर्षांवर आल्यामुळे नाशिक महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभाग या यंत्रणांकडून सिंहस्थानिमित्त विकास पर्वणी साधली जात आहे. नाशिक महापालिकेने भूसंपादनाच्या खर्चासह १७ हजार कोटींचा सिंहस्थ प्रारुप आराखडा सादर केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानेही  २५२९ कोटींचा प्रारुप आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयातील सिंहस्थ कक्षाकडे सादर केला आहे. या आराखड्यात प्रामुख्याने ग्रामीण रस्ते, विश्रामगृह उभारणी, आखाड्यांसाठी निवाराशेड आदी कामांचा समावेश असून नुसत्या रस्त्यांसाठी २३८० कोटी रुपयांचा समावेश आहे.

Kumbh Mela
Nashik : जलयुक्त 2.0 योजनेचा सरकारला विसर? 2 महिने उलटूनही आराखडा, निधीबाबत नाही सूचना

सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाची पर्वणी असते. या सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर नगरपालिका व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्यावर भर दिला जातो. सिंहस्थाच्या निमित्ताने तसेच त्यानंतरही वर्षभर नाशिक, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी देवी या तीर्थस्थळांवर भाविकांची गर्दी मोठी असते. यामुळे भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी  सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्तीवर अधिक भर देत २ हजार ५२९ कोटींचा आराखडा तयार केला आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कक्षासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावित कामांची यादी आणि त्यासाठी येणारा संभाव्य खर्च याचे सादरीकरण केले. यात प्रामुख्याने डहाणू - त्र्यंबकेश्वर-संभाजीनगर रस्ता, नांदगाव-पिंपळगाव अडसरे-टाकेद रस्ता, वाकी-देवळा- टाकेद हर्ष रस्ता, साकूर फाटा-पिंपळगाव निनावी-भरवीर रस्ता, अधरवड-टाकेद बुद्रुक रस्ता,  खेड (भैरवनाथ मंदिर) कळसुबाई मंदिर-इंदोरे रस्ता, इंदोरे-लहान कळसुबाई मंदिर रस्ता, कावनई-गोंदे व कावनई-मुकणे रस्ता काँक्रिटीकरण करणे यासारख्या कामांचा समावेश आहे. वाळविहीर-लोहारवाडी रस्त्याच्या काँक्रिटीकरण या रस्ते कामांचा समावेश आहे. या शिवाय कावनई येथील मंदिराचे सुशोभीकरण करणे, इगतपुरीतील कामख्या देवी मंदिर येथे सभामंडप बांधकाम व सुशोभीकरण करणे यासारखी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. रस्त्यांच्या कामांमध्ये प्रामुख्याने इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांमधील ग्रामीण रस्त्यांचा समावेश आहे. यामुळे भाविकांना त्र्यंबकेश्वर येथे येण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहेत.

Kumbh Mela
Mumbai Metro News : आरे ते BKC लवकरच धावणार मेट्रो; आरे डेपोचे काम पूर्ण

विश्रागृहांवर ६३ कोटींचा खर्च
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय विश्रामगृहांचा विस्तार करणे, दुरुस्ती करणे या कामांवरही ६३ कोटींच्या खर्चाचा या प्रारुप आराखड्यात समावेश केला आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा काळ व त्याव्यतिरिक्तही वर्षभर भाविकांचा राबता असतो. सिंहस्थ काळात हा ओघ अधिक असणार असल्याने नाशिक शहरातील गडकरी चौकालगत शासकीय विश्रामगृहांच्या दुरुस्तीची कामे सिंहस्थ निधीतून करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. याशिवाय याच परिसरात ५० कक्षांचे, त्र्यंबकेश्वर येथे २०, आणि इगतपुरीत १० कक्षांचे नवीन विश्रामगृह बांधण्याची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. याशिवाय पोलिसांसाठी वॉचटॉवर उभारणी, वाहनतळ, पोलीस व आखाड्यांमधील साधुंसाठी निवारा शेड या कामांसाठी ८६  कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे आराखड्यात नमूद आहे.

असा आहे प्रारुप आराखडा
 रस्त्यांची दुरुस्ती : २ हजार ३८० कोटी
 विश्रामगृह दुरुस्ती, बांधणी : - ६३ कोटी
 वाहनतळ, निवारा शेड, आरोग्य :  ८६ कोटी
 एकूण : २ हजार ५२९ कोटी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com