नाशिक (Nashik) : नाशिक दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नाशिककरांसाठी महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पाविषयी घोषणा केली आहे. नाशिकमध्ये लवकरच १६०० कोटींचा मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, त्याचे काम दोन टप्प्यांत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या २२६ कि.मी. लांबीच्या १८३० कोटींच्या प्रकल्पांचा लोकार्पण आणि कोनशिला अनावरण रविवारी (ता. १८) गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी मेट्रो प्रकल्पाबाबत घोषणा केली.
गडकरी म्हणाले, नाशिकच्या मेट्रो प्रकल्पासाठी १६०० कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली असून, या मेट्रोमध्ये चार लेन डबल डेकरच्या असणार आहेत. त्यामुळे नाशिकरोड ते द्वारका दरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. याबरोबरच गडकरी यांनी नाशिकमधील इतर वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांबाबतही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.
नाशिक शहरातील इंदिरानगर, राणेनगर, लेखानगर, दिपालीनगर या भागातील सतत होणाऱ्या वाहतुकीवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील या ठिकाणांच्या बोगद्याची लांबी वाढवण्यास मान्यता देण्यात आल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. खासदार हेमंत गोडसे यांनी यासाठी पत्रव्यवहार केला होता.
इंदिरानगर आणि राणेनगर येथील दोन्ही बोगद्यांची लांबी प्रत्येकी पंधरा मीटरने वाढवण्यात येणार आहे. यामुळे एक-एक बोगदा चाळीस मीटर लांबीचा होणार आहे. त्यासाठी सुमारे सव्वाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. आता लवकरच बोगद्यांची लांबी वाढवण्याच्या आणि रॅम्पच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार असून, या दरम्यानच्या महामार्ग आणि सव्हिस रोडवरील वाहतूक कोंडीतून शहरवासीयांची सुटका होणार आहे.