नाशिक (Nashik) : महापालिकेचा ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प मागील दोन महिन्यांपासून स्टार्टर बिघडल्याने बंद पडला होता. आता या वीज निर्मिती केंद्रात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या सिलिंडरमधील सेन्सर बंद पडल्याने वीज निर्मिती बंद आहे. यामुळे महिन्याला ९९ हजार युनिट वीज निर्मिती क्षमता असणाऱ्या या प्रकल्पाचे भवितव्य अंधारात सापडले आहे.
नाशिक महापालिकेने २०१७ मध्ये विल्होळीत जर्मनीच्या पर्यावरण मंत्रालयाच्या पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प ६.८ कोटी रुपयांच्या अनुदानातून साकारला आहे. यात महापालिकेची कुठलीही भांडवली गुंतवणूक नव्हती. मात्र, या प्रकल्पातून पालिकेला वर्षाकाठी लाखो युनिट वीज निर्मिती होऊन वीज वापरावरील खर्चात लाखो रुपयांची बचत होणार असल्याचे जाहीर केले होते. या प्रकल्पाचे नोव्हेंबर २०१७ मध्ये उद्घाटन झाल्यानंतर व्यवस्थापनाची जबाबदारी पुढील १० वर्षांच्या कालावधीसाठी मक्तेदार कंपनीवर होती. प्रकल्पासाठी आवश्यक कचरा, मलजल हे बंद वाहनांमधून आणणे, प्रकल्पातील पल्पर या युनिटमध्ये लगेचच टाकून प्रक्रिया करण्याची जबाबदारी ठेकेदाराची होती. मात्र, मागील सहा वर्षांत वेगवेगळ्या कारणांमुळे वीज निर्मितीमध्ये विघ्न येत आहे.
कोरोना महामारीनंतर जानेवारी २०२२ पासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवण्याचा प्रयत्न झाला. त्यातच गेल्या दोन महिन्यापासून वीज निर्मिती ठप्प झाली होता. दोन महिन्यांपूर्वी इंजिनचा ३२ हजार रुपये किमतीचा स्टार्टरमध्ये बिघाड झाल्याने वीज निर्मिती ठप्प झाली. हे स्टार्टर फ्रान्समध्ये मिळत असल्याने ते येण्यास वेळ लागणार असल्याचे कारण सांगण्यात आले. आता कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या गॅसच्या सिलिंडरमधील सेन्सर चालत नसल्यामुळे पुन्हा वीज निर्मिती बंद झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता बाजीराव माळी यांनी दिली. परिणामी सध्या ओला कचरा खत प्रकल्पावर नेऊन विल्हेवाट करण्याची वेळ येत असून, दरमहा ९९ हजार युनिट वीज निर्मितीची क्षमता असलेला एक चांगला प्रकल्प अखेरच्या घटका मोजत आहे.