नाशिक (Nashik) : एकलहरा येथील कर्षण मशीन कारखान्यात प्रस्तावित रेल्वे चाक दुरुस्ती तसेच चाक निर्मिती कारखान्याची चाचणी मंगळवारी (दि.५) घेण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने कारखान्यात चाक निर्मितीसाठी आवश्यक असलेली ८० टक्के मशिनरी बसवली असून उर्वरित मशिनरी बसवून पुढच्या दोन महिन्यांमध्ये हा कारखाना सुरू होणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले. जवळपास ५६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हा कारखाना उभारण्यात आला असून यातून वर्षाला ५०० रेल्वेचाकांची निर्मिती अपेक्षित आहे.
नाशिक तालुक्यातील एकलहरा येथे रेल्वेचा कर्षण मशीन कारखाना आहे. या कारखान्यात रेल्वेच्या विद्युत पंपांच्या वायर रिवांइंडिंगचे काम केले जाते. या कामाबरोबरच या कारखान्यात रेल्वेचा चाक निर्मितीचा कारखाना सुरू करावा, असा प्रस्ताव खासदार हेमंत गोडसे यांनी मांडून त्यासाठी पाठपुरावा केला होता. केंद्र शासनाने २०१५ मध्ये या कारखान्याला मान्यता दिली असून ५६ कोटींच्या निधीलाही मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार चाके निर्मितीची ८० टक्के मशीनरी कारखान्यात बसवण्यात आली आहे. यामुळे मंगळवारी (दि.५) कारखान्यात व्हील सेट तयार करण्याची चाचणीही घेण्यात आली.
याप्रसंगी कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक अलोक शर्मा, अतिरिक्त मटेरियल मॅनेजर निखिलेश कुमार, भारत पाटील, सुभाष सोनवणे, सचिन धोंगडे, किरण खैरनार, जय आतिलकर, के.डी. बोरसे, ओमकार भोर, विवेक कांबळे आदी उपस्थित होते. या कारखान्यात कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांत दोन व्हील सेट केले आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांत भुसावळ आणि पुणे येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी एकलहरे येथील कारखान्यातर दोन व्हील सेट तयार केले आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगार प्राप्त होईल. परिणामी नाशिक रोड परिसरातील आर्थिक उलाढाल देखील वाढणार आहे. पहिल्या टप्प्यात या कारखान्यात वर्षाला ५०० व्हील तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.