नाशिक (Nashik) : प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मुख्य मंदिर (Trimbakeshwar Jyotirling Mandir) व नंदी मंडप यांना जोडण्यासाठी देवस्थानने पुरतत्व विभागाची परवानगी न घेता उभारलेला लोखंडी पूल काढून ठेवण्याची नामष्की देवस्थानवर आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर राष्ट्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असून या वास्तूसंबंधी कोणतेही बदल करण्यापूर्वी राष्ट्रीय पुरातत्व विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, देवस्थानने परवानगी न घेताच, परस्पर टेंडर प्रक्रिया राबवून पूल उभारला. यामुळे माजी विश्वस्तांनी राष्ट्रीय पुरातत्व विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. यामुळे देवस्थानचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे.
त्र्यंबकेश्वर येथे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक प्रमुख ठिकाण असून, येथे दर्शनासाठी भाविकांची वर्षभर वर्दळ असते. सध्याचे मंदिर पेशवेकालीन असून या मंदिराचा जिर्णोद्धार अहल्याबाई होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला आहे. हे मंदिर राष्ट्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येते. यामुळे या मंदिर परिसरात कोणतेही बदल करण्याचे अधिकार पुरातत्व विभागाचे आहेत. तसेच भाविकांसाठी काही सोईसुविधा करायच्या असल्यास देवस्थानने पुरातत्व विभागाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. यावरून देवस्थान व राष्ट्रीय पुरातत्व विभाग यांच्यात कायम मतभेद होत असतात.
आताही त्र्यंबकेश्वर देवस्थानने मुख्य मंदिर व नंदी मंडप यांना जोडण्यासाठी २० फूट लांबीचा व सहा फूट रुंदीचा पूल उभारला. भाविकांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग या पुलामुळे बंद झाला. तसेच या भक्कम लोखंडी पुलामुळे मंदिराच्या प्रांगणातील दगडी फरशा, मुख्य मंदिर व नंदी मंडपावरील चबुतऱ्यावर भक्कम लोखंडी खांब ठेवल्यामुळे मूळ बांधकामाला धक्का पोहोचण्याची शक्यता होती. या पुलामुळे नंदी मंडपात नंदीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना सात पायऱ्या उतरण्याचा व मुख्य मंदिरात जाण्यासाठी नऊ पायऱ्या चढण्याचा त्रास वाचणार होता, पण यामुळे मूळ बांधकामाची हानी होण्याचा धोका असल्याने त्र्यंबकेश्वरमधील रहिवाशांनी नापसंती व्यक्त केली होती.
याची दखल घेऊन माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी राष्ट्रीय पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. तसेच या पुलाचे फोटो पाठवले. या पुलामुळे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मूळ रचनेला बाधा येत आहे. तसेच हे बांधकाम करताना नियमानुसार राष्ट्रीय पुरातत्व विभागाची परवानगी घेतली नाही. तसेच पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली बांधकाम करण्यात आले नाही. यामुळे पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या वास्तुंची देखभाल करण्याच्या नियमांचा भंग झाला असल्याचे पुरातत्व विभागाच्या अधीक्षकांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या अध्यक्षांना पत्राद्वारे कळवले.
या पत्रानंतर देवस्थानने तातडीने तो पूल हटवला असून तेथेच मंदिर पसिरात ठेवला आहे. या लोखंडी पुलाच्या उभारणीसाठी देवस्थानने टेंडर प्रक्रिया राबवली होती, असे देवस्थानमधील जनसंपर्क अधिकारी वैद्य यांनी सांगितले. यासाठी किती रक्कम लागली, याबाबत त्यांनी माहिती दिली नसली, तरी यामुळे भाविकांच्या देणगीमधून मिळालेली लाखोंची रक्कम वाया गेल्याचे प्रथम दर्शनी दिसते आहे. या पूल उभारणीचा खर्च विश्वस्तांकडून वसूल करावा, अशी मागणी ललिता शिंदे यांनी केली आहे.