नाशिक (Nashik) : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी २६०० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या असून त्यांची कामे ३१ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, या विभागांनी वेळेवर योजना पूर्ण केल्या नाहीत. तसेच यावर्षी जिल्ह्यात केवळ ७० टक्के पाऊस झाल्याने अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील शेकडो गावे व वस्त्यांमधील सात लाखांवरील म्हणजे २० टक्के नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत असून त्यासाठी सरकारने आतापर्यंत ६३ कोटी रुपये खर्च केले आहेत. एकीकडे या या विभागांच्या पाणी योजनांचे जलस्त्रोत कोरडे पडल्यामुळे तेथेही टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.
केंद्र सरकारने प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा हे घोषवाक्य घेऊन जलजीवन मिशन ही योजना तयार केली आहे. त्यात प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे, तर एकट्या गावांसाठी पाणीपुरवठा योजना उभारण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून १४१० कोटींच्या १२२२ योजना मंजूर केल्या असून त्यातील ६८१ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेल्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडूनही जिल्ह्यात ३८ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू असून बहुतांश योजनांची कामे ६० टक्क्यांपेक्षा अधिक झाली असली, तरी अद्याप एकाही योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. या दोन्ही यंत्रणांना जलजीवन मिशनमधील पाणी पुरवठा योजनांची कामे ३१ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना होत्या. मात्र, या मुदतीत सर्व योजना पूर्ण झालेल्या नाहीत. त्यातच मागील पावसाळ्यात नाशिक जिल्हयात सरासरीच्या केवळ ७० टक्के पाऊस झाला असल्याने पर्जन्यछायेच्या तालुक्यांमध्ये अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची लोकसंख्या ३५ लाख असून त्यापैकी ७ लाखांवर म्हणजे २० टक्के लोकसंख्येला टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यात टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी विहिर अधिग्रहण व टँकर वाहतूक खर्च मोठ्याप्रमाणावर होत आहे. मागील जुलैपासून आतापर्यंत या टँकर व विहिर अधिग्रहणासाठी ६३ कोटी रुपये खर्च झाला आहे. त्यातील केत्तल ८ लाख रुपयांची देयके टँकरचालकांना देण्यात आली असून ५५ कोटींच्या देयकांसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे मागणी केली आहे.
जिल्ह्यासाठी केवळ दोन टँकर पुरवठादार
नाशिक जिल्ह्यत या आठवड्यात ३६१ गावे व ९३६ याड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सरू आहे. यासाठी १४ सरकारी व ३७६ खासगी टँकरचा वापर केला जात असून या पाणी पुरवठ्यासाठी टँकरच्या ८७१ फेर्या मारल्या जात आहेत. जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी मागील आठ-दहा वर्षांपासून दोनच पुरवठादार असून ते पुरवठादार जिल्हयाच्या पूर्वभागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करतात. यावर्षी पश्चिम भागातील अधिक पाऊस होत असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण या तालुक्यांमध्येही टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
तालुकानिहाय टँकरद्वारे पाणी पुरवण्याचा खर्च
नाशिक : १०.८० लाख रुपये
चांदवड : ४.१० कोटी रुपये
नांदगाव : ३२.१९ कोटी रुपये
बागलाण : ३.२८ कोटी रुपये
देवळा : १३.८८ कोटी रुपये
मालेगाव : ४.४८ कोटी रुपये
येवला : ४.५३ कोटी रुपये
सिन्नर : १.३० कोटी रुपये
एकूण : ६२.८९ कोटी रुपये