Nashik : अखेर वैतरणा-देव नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर राज्यस्तरीय तांत्रिक समितीला सादर

lift irrigation project
lift irrigation projectTendernama
Published on

नाशिक (Nashik) : सिन्नर तालुक्यासाठी महत्वाचा असलेला व ५.६ टीएमसी क्षमतेचा दमणगंगा-वैतरणा-कडवा-देव नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने मे अखेरीस राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे सादर केला आहे. सविस्तर प्रकल्प अहवालानुसार हा नदीजोड प्रकल्प ७५०० कोटी रुपयांचा असून या प्रकल्पामुळे कायम दुष्काळी असलेल्या सिन्नर तालुक्यांतील १३ हजार ८०० हेक्टर सिंचन होऊन तालुक्याच्या भाळावरील कायमदुष्काळी हा शिक्का कायमचा पुसला जाणार आहे. याशिवाय दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठीही या प्रकल्पातून पाणी उपलब्ध होणार आहे. राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या मान्यतेनंतर तो राज्य सरकारकडे सादर होईल.

lift irrigation project
Nashik ZP News : नाशिक जिल्हा परिषदेच्या इतिहासातील पहिलीच घटना; ठेकेदाराने बघा काय केले!

सिन्नर हा कायमस्वरुपी दुष्काळी तालुका असून येथील सरासरी पर्जन्य ४०० मिमी आहे. हा तालुका गोदावरी खोऱ्यात असूनही समुद्रसपाटीपासून ५०० मीटर उंचीवर आहे. यामुळे गोदावरी खोऱ्यातील पाणी वाटपात सिन्नर तालुक्याला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. यावर तोडगा म्हणून  दमणगंगा-वैतरणा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी बंदिस्त जलवाहिनीतून लिफ्टद्वारे उचलून सिन्नरला नेणे हा एकमेव पर्याय असल्याची बाब जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी मांडली होती. त्या संकल्पनेनुसार खासदार हेमंत गोडसे यांनी या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी केंद्र व राज्याच्या परवानगी मिळून देण्यासाठी प्रयत्न केले व त्यातून या नदीजोडचा सविस्तर प्रकल्प तयार करण्याचे काम सुरू झाले. हा प्रकल्प सिन्नर तालुक्यासाठी असल्याने तो अधिक सर्वसमावेशक व्हावा, यासाठी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनीही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. खासदार गोडसे यांनी मागील वर्षी सप्टेंबरमध्येच हा प्रकल्प राज्यस्तरीय तांत्रिक समितीला सादर झाल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात तो सविस्तर प्रकल्प अहवाल मागील महिन्यात पूर्ण होऊन मे अखेरीस तो राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे सादर करण्याची आला आहे.

lift irrigation project
Nashik : मजिप्रच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची केवळ 58 टक्के कामे; अपूर्ण योजनांमुळे...

असा आहे प्रकल्प अहवाल
दमणगंगा व वैतरणा खोऱ्यात निळमाती, मेट, कोशिमशेट, उधळे येथे बंधारे बांधले जाणार आहेत. या चार जलाशयांमधील पाणी वैतरणा धरणात आणून तेथून २८ किलोमीटर पाइपने कडवा धरणात टाकणे. बोरखिंड ते देवनदीदरम्यान पाइपलाइन व बोगद्याद्वारे पाणी सिन्नर तालुक्यात देवनदीच्या उगमस्थानापर्यंत आणले जाणार आहे. देवनदीत पाणी सोडल्यानंतर सोनांबे मार्गे सरदवाडीच्या - पुढे देशवंडी येथील ढग्या डोंगरात बोगदा करून पाणी सुळेवाडीत जाईल. या परिसरातील देशवंडी, नायगाव, जायगाव, पाटपिंप्री, बारागाव पिंप्री, निमगाव सिन्नर, हिवरगाव, कोमलवाडी, वडांगळी व गुळवंचमार्गे खोपडी, देवपूर मार्गे पाण्याची वितरण व्यवस्था प्रस्तावित करण्यात आली आह. तसेच सोनांबेहून गोंदे, दोडी खुर्दमार्गे पूर्वेकडे तालुक्यातील शेवटचे सायाळे, या भागापर्यंत हे पाणी नेण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी पाणी उचलण्यासाठी लागणाऱ्या विजेची गरज भागवण्यासाठी १३० मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा खर्चही या सविस्तर प्रकल्प अहवालात समाविष्ट करण्यात आला आहे.

असा होणार पाणी वापर
सिंचनासाठी : ३६०० दलघफू
पिण्यासाठी : ८४७ दलघफू
 उद्योगासाठी : ८३८ दलघफू

असा आहे प्रकल्प
प्रकल्पाची एकूण लांबी ८३.२ किलोमीटर
उर्ध्वगामी जलवाहिनीची लांबी : ४१.६९ किमी
बोगद्यांची लांबी १६.९४
विजेची गरज : १२६ मेगावॅट
पाणी उपलब्धता : ५६०० दलघफू
भूसंपादन : १३९४  हेक्टर

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com