नाशिक (Nashik) : नाशिक जिल्हा रुग्णालयाकडून शवविच्छेदन गृहाच्या विस्तारासाठी गेल्या तीन वर्षांपासून केल्या जात असलेली मागणी अखेरीस जिल्हा नियोजन समितीने मान्य केली आहे. जिल्हा नियोजन समितीने जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाच्या विस्तारासह मृतदेह ठेवण्यासाठी ८० शवपेट्या मंजूर करण्यात आल्या असून त्यासाठी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या शवागारातील शीतयंत्रणा जवळपास तीन वर्षांपासून बंद पडलेली होती. यामुळे जिल्हा रुग्णालयात शीतयंत्रणेच्या अभावी बेवारस मृतदेह कुजून गेल्याने त्यांची दुर्गंध पसरल्याचा प्रकार नोव्हेंबर २०२२ मध्ये उघडकीस आला होता. त्यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी भेट देत शवागाराची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री भुसे यांनी तेथील दुरवस्था त्यांच्या नजरेस आली होती. शवागारातील शीत शवपेट्या जर्जर अवस्थेत असल्याने त्याचा फारसा फायदा होताना दिसत नव्हता. त्यामुळे जिल्हा रुग्णालायकडून एकूण ५० शीत शवपेट्यांची मागणी केली होती.
मात्र हा प्रस्ताव गेल्या तीन वर्ष लालफितीत अडकलेला होता. तसेच पालकमंत्र्यांच्या पाहणी दरम्यान लक्षात आले की, गेल्या दोन महिन्यांपासून मृतदेह कुजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली होती. यामुळे पाालकंमत्र्यांनी शवागाराच्या शीतयंत्रणेसाठी शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावचे तातडीने पाठपुरावा करण्याचे आदेश दिले होते.यावेळी किमान ६० मृतदेहांची व्यवस्था होईल अशी यंत्रणा उभारण्याच्या प्रस्तावाचा पाठ पुरावा करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले होते.
या विषयांकडे गांभीर्याने बघत डीपीडीसीच्या बैठकीत या विषयाला प्राधान्याने देण्यात आले व जिल्हा रुग्णालयाला तब्बल ८० शव पेट्या मंजूर करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीने ८० लाखांचा निधी मंजूर केला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता केवळ एक महिना उरला असून या कालावधीमध्ये कमी कालावधीचे टेंडर राबवून जिल्हा रुग्णालयास हा निधी खर्च करून त्यातून यंत्रणा उभारावी लागणार आहे.