नाशिक (Nashik) : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या कल्पनेनुसार नाशिक जिल्हा परिषदेने (Nashik ZP) श्री सप्तशृंगगड ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखडा 2019 मध्ये तयार केला. पुढे त्याबाबत काहीही पाठपुरावा झाला नाही. यामुळे पालकमंत्री झाल्यानंतर भुसे यांनी वनविभाग, जिल्हा नियोजन समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामविकास विभाग यांच्या समन्वयातून गडाच्या विकासासाठी सर्वंकष विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागांची बैठक घेऊन समन्वयातून आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. वणी गाव, नांदुरी गाव व सप्तशृंग गड या भागाच्या विकासासाठी महिनाभरात विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना भुसे यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. आराखड्यात सुचवलेल्या कामांचे स्वरुप बघता किमान 250 कोटींचा आराखडा होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमप, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, सप्तशृंगी देवस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे आदींसह देवस्थान, ग्रामपंचायत, वन विभाग, वीजवितरण कंपनीसह विविध विभागांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत सप्तशृंग गड विकासाबाबत बैठक घेतली.
सप्तशृंगी गड विकास आराखड्यात गडासह नांदुरी व वणी गाव यांचाही समावेश करण्याचा यावेळी निर्णय झाला. विकास आराखडा तयार करताना सप्तश्रृंग गड ग्रामपंचायत, देवस्थान, जिल्हा नियोजन समिती, वन विभाग आदी यंत्रणांनी एकत्र येऊन त्या त्या विभागाची कोणती कामे करता येऊ शकतील याचा अभ्यास करून विभागाचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करायचा व सर्व विभागांचा मिळून एकत्रित विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या. सर्व विभागांचे आराखडे तयार झाल्यानंतर सर्व विभागांशी समन्वय साधून एकत्र आराखडा तयार करण्याची जबाबदारी जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांच्यावर सोपवली आहे. तसेच महिनाभरात अंतिम आराखडा करण्याचा निर्णय झाला.
सप्तशृंग गड विकास आराखड्यात मलनिस्सारण केंद्र उभारणे, गडावरील पिण्याच्या व घरगुती वापराच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी धरण बांधणे, स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबवणे, गडावर जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार करणे आदी कामांचा समावेश करण्याचे यावेळी ठरले. मलनिस्सारण केंद्र उभारताना त्यातील सांडपाण्याचा पुनर्वापर उद्यान व झाडासाठी होईल. याचे नियोजन करावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली. सप्तशृंग गडावर भाविकांच्या सुरक्षेसह स्थानिक सात - आठ गावांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे, पाण्याची सोय, रस्ते विकास याबाबत चर्चा झाली. यात्रोत्सव काळात गडावर जाण्यासाठी व तेथून उतरण्यासाठी दोन स्वतंत्र मार्ग असावेत, याबाबत बैठकीत एकमत झाले. यामुळे पर्यायी मार्ग शोधण्याबाबत चर्चा झाली. त्यातच वणी गावातून सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी रोप वे करता येऊ शकेल, याबाबतही चर्चा झाली. मात्र, त्यासाठी त्रयस्थ व तज्ज्ञ संस्थेकडून आधी तपासणी करून अहवाल मिळवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. तसेच गडावर बहुतांश जागा वनविभागाच्या आहेत, यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचाही या आराखडा समितीत समावेश करण्याचे यावेळी ठरले.
सप्तशृंग गडावर 101 कुंड आहेत. त्यापैकी 40 कुंड जिवंत आहेत. त्या कुंडांप्रमाणे उर्वरित कुंडांचे पुनरुज्जीवन करण्यावरही चर्चा होऊन त्याचाही विकास आराखड्यात समावेश करण्याचे ठरले. गडावर लहान मुलासाठी उद्यान उभारावे, तसेच नांदुरी गावातील तलावाची साठवण क्षमता वाढवण्याचा निर्णय झाला.