नाशिक (Nashik) : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) कामे मंजूर करण्यासाठी तसेच देयकांची रक्कम देण्यासाठी मंत्रालय स्तरावरून अधिकाऱ्यांकडून टोल वसूल केला जातो. अधिकाऱ्यांनी पैसे गोळा करण्यासाठी स्वतंत्र माणूस नेमावा, पण आमची देयकांची पूर्ण रक्कम द्यावी, अशा आशयाचे विधान ठेकेदारांच्या संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिकच्या मुख्य अभियंत्यांच्या दालनात दालनात त्यांच्यासमोर केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतून सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणेच इतर विभागांमध्ये कामे मंजूर करणे व निधी वितरित करणे यासाठी कसा टोल घेतला जातो, याचे उघडसत्य समोर आल्याने हा व्हिडिओ चर्चेचा विषय झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात मंजूर केलेल्या इतर जिल्हा मार्ग व राज्य मार्गांची जवळपास सातशे कोटींची कामे पूर्ण होऊन ठेकेदारांनी देयके सादर केली आहेत. मात्र, या देयकांसाठी केवळ ४६.४० कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता औटी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी त्यांनी नुकत्याच रुजू झालेल्या अधीक्षक अभियंता श्रीमती शर्मा यांच्यासह कार्यकारी अभियंत्यांना ठेकेदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चेसाठी दालनात बोलावले. यावेळी झालेल्या चर्चेचे मोबाईलवर चित्रीकरण झाले असून त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ठेकेदार संघटनेचे प्रतिनिधी अधिकाऱ्यांकडे देयकांसाठीचा सर्व निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी आग्रह धरीत आहेत.
त्यात बोलण्याच्या ओघात एक जण देयक देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी टोल घेत नसले, मंत्रालयातील कक्ष अधिकारी टोल घेत असल्याचा आरोप केला आहे. तसेच तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांन उद्देशून ते म्हणतात, की तुम्ही पैसे घेत नाहीत, तुमचा त्याच्याशी संबंध नाही, असे तुम्ही म्हणत आहात. तुम्हालाही पैसे घ्यायचे असेल, तर घ्या, पण तुम्ही एक आकडा फिक्स करा व देयकांसाठीचा संपूर्ण निधी वितरित करावा. पैसे गोळा करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र माणून नेमावा, पण देयकांची पूर्ण रक्कम द्यावी, असे म्हणत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या शिवाय या व्हिडीओतील दुसरा एक जण कामे मिळवणे ते वर्क ऑर्डरपर्यंत आम्ही दिलेले पैसे विभागातील संबंधितांकडून एका दिवसात परत घेण्याची ताकद ठेवून आहोत. मात्र, तसे आम्हाला करायचे नाही. लोकप्रतिनिधी पैसे खाऊन घेतात. विभागाचे लोक पैसे खाऊन घेतात. पुढे काम झाले की नाही, देयकांना निधी आला की नाही, याच्याशी त्यांना काही देणे घेणे नाही, असेही बोलत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ठेकेदार एवढ्या गंभीर स्वरुपाचे आरोप करीत असतानाही तेथे उपस्थित असलेले अधिकारी यावर काहीही बोलत नाही अथवा हस्तक्षेप करीत नाही, हे विशेष.
सध्या मार्च अखेर असून सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये देयके काढण्याचे काम सुरू आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची देयक देण्यासाठी निधी वितरित न केल्यामुळे त्यांच्या भावना संतप्त असून त्यातून त्यांनी सर्वच सरकारी विभागांमध्ये ठेकेदारांकडून केल्या जाणाऱ्या वसुलीचे वास्तव मांडल्याचा हा व्हिडिओ समोर आल्यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे.