नाशिक (Nashik) : महापालिकेच्या समाजकल्याण विभागाचा महिला स्वयंरोजगार प्रशिक्षणाचा ठेका पुन्हा वादात सापडला आहे. महापालिकेने महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी ठेकेदार संस्थेला कार्यादेश दिलेले असताना या संस्थेने कर्ज व अनुदान मिळवण्याच्या नावाखाली जवळपास १५० महिलांकडून प्रत्येकी दहा ते अकरा हजार रुपये उकळल्याची तक्रार संबंति महिलांनी केली आहे.
या तक्रारीनंतर महापालिकेकडील देयक अडवले जाऊ नये म्हणून या ठेकेदाराने घाईघाईने संबंधित महिलांना धनादेशाद्वारे रक्कम परत केली आहे. मात्र, यातून ठेकेदाराने प्रशिक्षणार्थींकडून बेकायदेशीरपणे पैसे घेतल्याचे स्पष्ट झाल्याने समाजकल्याण विभागाने चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत ठेकेदार दोषी आढळल्यास थेट गुन्हा दाखल करण्यासह संबंधित संस्थेची देयके रोखली जातील, अशी माहिती समाजकल्याण उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली.
महापालिकेच्या समाज कल्याण समितीतर्फे महिलांना दिला जाणारा स्वयंरोजगार प्रशिक्षणासाठी अंदाजपत्रकात जवळपास ७ कोटींची तरतूद केली होती. या निधीतून गरजू महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देऊन त्यांना पायावर उभे करण्याचा हेतु आहे. यामुळे या प्रशिक्षणासाठी महिलांची निवड केली. त्यानंतर टेंड प्रक्रिया राबवून या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी इंद्रजित टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थेची नियुक्ती करण्यात आली. या संस्थेच्या वतीने गंगुज फाउंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षणाबरोबरच महिलांना रोजगार मिळवून देणे व व्यवसायासाठी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम व हार्दिक राम उद्योगाच्या माध्यमातून पाच ते दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. कर्ज व अनुदान मिळवण्यासाठी या महिलांकडून प्रत्येकी ६ ते ११ हजार रुपयांची रक्कमही घेण्यात आली.
अनेक दिवस उलटूनही महिलांना कर्जही मिळाले नाही. तसेच अनुदानही मिळाले नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे या महिलांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते व शिवसेना (उबाठा) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडे तक्रार केली. बडगुजर यांनी समाजकल्याण विभागाकडे तक्रार केली असून या प्रकरणी पोलिसांतही तक्रार दिली जाणार आहे. फसवणूक झालेल्या महिलांनी असेल महापालिका किंवा समाजकल्याण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. या प्रकरणात अडचणी वाढणार असल्याचे लक्षात येताच इंद्रजित टेक्निकल इन्स्टिट्यूटचे कैलास सोनवणे व गंगुज फाउंडेशनचे ईश्वरमूर्ती बोडके यांनी दीडशे महिलांकडून घेतलेले पैसे धनादेशाद्वारे परत केले आहेत. या दोन्ही संस्थांनी महिलांना धनादेशाद्वारे पैसे परत केल्यामुळे त्यांनी महिलांची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे समाजकल्याण उपायुक्त प्रशांत पाटील यांनी या संस्थेची चौकशी सुरू केली आहे.