नाशिक (Nashik) : पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गाची नाशिक जिल्ह्यात आता चौथ्यांदा अलाईनमेंट बदलणार असल्याचे संकेत नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.
नाशिक जिल्ह्यात नाशिक व सिन्नर या दोन तालुक्यांमध्ये पुणे-नाशिक हायस्पीड ट्रेनचा मार्ग जातो. त्यात सिन्नर तालुक्यातील ४५ हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे. मात्र, मधल्या काळात रेल्वे मंत्रालयाने परवानगी नाकारल्यामुळे महारेल कॉर्पोरेशनने भूसंपादनाचे काम थांबवले होते. राज्य सरकारने आता हा रेल्वेमार्ग मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू केल्या असताना त्याच्या अलाईनमेंट बदलण्याचे संकेत दिले आहे. या मार्गाच्या अलाईनमेंट आतापर्यंत त तीनवेळा बदलल्या असून पुन्हा एकदा अलाईनमेंट बदलाचे संकेत दिल्याने सिन्नर तालुक्यातील भूसंपादन केलेल्या क्षेत्राचे काय, असा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडी सरकारने पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प महारेल कॉर्पोरेशनकडून राबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठी रेल्वे मंत्रालयाची परवानगी घेतली नाही. या काळात रेल्वे मार्गाची दोनदा अलाईनमेंट बदलण्यात आली. दरम्यान रेल्वे मंत्रालयाची परवानगी नसल्यामुळे मागील वर्षभरापासून या प्रकल्पाचे भूसंपादन रखडले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचा एक गट अजित पवार यांच्या नेतत्वाखाली राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा आढावा मंगळवारी (दि.८) व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, महारेल तसेच रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
नाशिक तालुक्यातील पाच आणि सिन्नर तालुक्यातील १७ अशा २२ गावांमधून हा रेल्वे मार्ग जातो. या दोन्ही तालुक्यांमध्ये २४२ हेक्टर जमिनीचे संपादन करायाचे आहे. नाशिक तालुक्यातील पाच गावांमधील ४५ हेक्टर जमिनींच्या संपादनासाठी दर निश्चित झाले असले तरी ते जाहीर केलेले नाहीत. सिन्नर तालुक्यातील काही गावांमधील जमिनीचे दर जाहीर करून तेथे प्रत्यक्ष संपादनही सुरू झाले असून १९७ हेक्टरपैकी ४५ हेक्टर जमिनीची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकल्पासाठी सरकारी, खासगी आणि वन विभागाच्या जमिनी संपादीत करावयाच्या असून आतापर्यंत १८ टक्के जमिनींचे संपादन झाल्याची माहिती जिल्हाधिकारी शर्मा यांनी या बैठकीत दिली. उर्वरीत जमिनी संपादित करण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी असून संबंधित शेतकरी देखील जमिनी देण्यास तयार असल्याची माहिती शर्मा यांनी माध्यमांना दिली. या प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्रालयाच्या स्तरावर समिती गठीत होणार असून त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश असणार आहे. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाची अलाईनमेंट बदलण्याची शक्यता असून निधीचा विषय देखील रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच मार्गी लागण्याची शक्यता शर्मा यांनी व्यक्त केली. तूर्तास महारेलच हा प्रकल्प पुढे घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.