नाशिक (Nashik) : आदिवासी बहुल ग्रामपंचायतींचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री ग्रामविकास योजनेसाठी राज्यातील १५४२ ग्रामपंचायतींना ३१४ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या निधीतून निवड झालेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत २०.३८ लाख रुपयांची कामे करता येणार आहेत.
अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या असलेल्या गावांचा आदर्श गाव संकल्पनेवर आधारित एकात्मिक आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी केंद्र सरकारने आदर्श ग्राम विकास ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना २०२१-२२ ते २०२५-२६ या कालवधीत राबवली जात असून केंद्र सरकारने या योजनेसाठी ३६०५ गावांची निवड केली आहे. ही योजना पाच वर्षे राबवली जाणार असल्याने दरवर्षी एक पंचमांश गावांना प्रत्येकी २०.३८ लक्ष रुपये निधी एकवेळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या गावांपैकी १५४२ गावांचे ग्राम विकास आराखडे मंजुर केल्याचे कळवले आहे. त्यानंतर केंद्र शासनाकडुन प्राप्त झालेला निधीआदिवासी विकास मंत्रालयाने वितरीत केला आहे.
नाशिकला १०.३८ कोटी
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल ग्रामपंचायतींचे ग्रामविकास आराखडे तयार झाले असून त्यातील १२९ गावांचे आराखडे मंजूर केले आहेत. या १२९ कामांना प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष प्रस्तावित निधीच्या अनुषंगाने प्राप्त निधीच्या प्रमाणात १०.३८ कोटी रुपये निधी वितरित केला आहे. या ग्रामपंचायतीना या योजनेतून एकदाच निधी दिला जाणार असून त्यांनी मंजूर निधीपेक्षा अधिक निधी दिला जाणार नाही. यामुळे या मर्यादेतच निधी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.