नाशिक (Nashik) : सिन्नर (Sinnar) येथील औद्योगिक वापरासाठी अधिग्रहित करण्यात आलेली जमीन खोल दरीत असून, ती औद्योगिक वापरासाठी शून्य उपयोगाची असल्याचा आरोप एका उद्योजकाने केला आहे. हा भूखंड घोटाळा असून, त्याची खुली चौकशी करण्याची मागणी त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान ही जमीन कोणाची आहे व एमआयडीसीचे अधिकारी त्यांच्यावर एवढी मेहेरबान का झाले, असा प्रश्न या निमित्ताने उपास्थित होत आहे.
माळेगाव- सिन्नर औद्योगिक वसाहतीतील मापारवाडी शिवारातील १६ हेक्टर खोल दरी असलेल्या जमिनीच्या अधिग्रहणापोटी जागा मालकाला रक्कम अदा करण्यात आली आहे. यामुळे एमआयडीसीकडून या प्रकरणाची चौकशीही सुरू आहे. यामुळे या दरीत उद्योग सुरू करायचे नसून ती जमीन 'ओपन स्पेस' दाखवण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. ओपन स्पेस असल्याचे सांगून या घोटाळ्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आहे. यामुळे या प्रकरणाची खुली चौकशी करावी, अशी मागणी उद्योजक जयप्रकाश जोशी यांनी केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनेक भूखंड घोटाळे होत असून, त्यात अधिकारीच सहभागी असल्याच्या चर्चा आहेत. परिणामी, तरुण व नवउद्योजकांना भूखंड मिळणे अशक्य होते. नाशिकच्या सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत दहा वर्षांपासून अनेकांनी नव्या उद्योगासाठी भूखंडाची मागणी केली आहे. मात्र, प्रादेशिक कार्यालयातून प्रत्येकवेळी भूखंड शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. ज्येष्ठ उद्योजक जयप्रकाश जोशी यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे मुख्यकार्यकारी अधिकारी अन्बलगन यांना या घोटाळ्याबाबत पत्र लिहिले आहे.
अंबडबाबतही तक्रार
नाशिक येथील अंबड औद्योगिक वसाहतीत आय. टी. उद्योगाला चालना देण्यासाठी काही भूखंड राखीव ठेवण्यात आले होते. आय. टी. उद्योगांच्या नावाखाली ते भूखंडमिळवण्यात आले व तेथे अन्य उद्योग सुरू करण्यात आले. त्यातून महामंडळाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला, असा आरोपही जयप्रकाश जोशी यांनी केला आहे.