नाशिक (Nashik) : प्रत्येक घराला नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशनमधून (Mission Jal Jeevan) नाशिक जिल्हा परिषदेच्या (Nashik Z P) माध्यमातून 1292 पाणी पुरवठा योजना राबवल्या जात आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या 464 योजनांच्या कामांपैकी केवळ 13 ठेकेदारांना 252 कामे दिली आहेत. त्यात ठराविक ठेकेदारांना 20 ते 40 कामे देण्यात आली आहेत. यामुळे या योजनांच्या कामांचा दर्जा व वेळेत कामे कितपत पूर्ण होतील, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारने प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन मिशन सुरू केले आहे. ही योजना मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेने 1915 गावांपैकी 1292 गावांमध्ये पाणी पुरवठा योजनाचे आराखडे तयार केले असून हजारावर योजनांना प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. यापूर्वी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे नोंदणी केलेल्या ठेकेदारांची संख्या मर्यादित होती. मात्र, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जलजीवनमधून मोठ्या संख्येने कामे प्रस्तावित केली. कामांच्या तुलनेत ठेकेदार कमी असल्याने विशेष अधिकारांचा वापर करून टेंडर मंजूर करण्याचे धोरण ठरवण्यात आले. मात्र, या धोरणाचा वापर करून ठराविक ठेकेदारांवर विशेष मेहेरबानी केल्याचे कामांच्या यादीवरून दिसत आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ऑगस्ट अखेरपर्यंत 451 पाणी पुरवठा योजना कामांचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. ही 451 कामे 63 ठेकेदारांना देण्यात आली असून त्यातील 252 कामे केवळ 12 ठेकेदारांना देण्यात आली आहेत. म्हणजे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची 55 टक्के कामे केवळ 13 ठेकेदार करणार असून, 33 ठेकेदारांना प्रत्येकी पाच पेक्षा अधिक कामे दिली आहेत. तसेच 13 ठेकेदारांना प्रत्येकी केवळ एक काम दिले आहे. ठेकेदार कमी व कामे अधिक यामुळे जिल्हा परिषदेने टेंडर मंजूर करताना काही सवलती दिल्या. पण या सवलतींचा फायदा उठवत आपल्या मर्जीतील ठेकेदारांना मुबलक कामे देण्यात आली.
एका ठेकेदाराला तर 37 कामे देण्यात आली आहेत. ही कामे मार्च 2024 पर्यंत पूर्ण करायची आहेत. मात्र, वेगवेगळ्या गावांमध्ये असणारी ही कामे एका ठेकेदाराकडून करणे शक्य नाही. यामुळे अधिक कामे करण्यासाठी संबंधित ठेकेदार उपठेकेदार नेमत आहेत. यामुळे कामाचा दर्जा टिकवणे शक्य होणार नाही, असे बोलले जात आहे.