नाशिक (Nashik) : इंदूर-पुणे (Indure-Pune) राष्ट्रीय महामार्गावर आणि नागपूर-मुंबई रेल्वेमार्गावरील ६१ वर्षे जुना उड्डाणपूल कोसळल्यामुळे इंदूर-पुणे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली आहे. या पुलाच्या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसून रेल्वे वाहतूक सुरळीत आहे. दरम्यान पुलाच्या दुरुस्तीसाठी दीड महिना लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले.
मनमाड येथे बुधवारी पहाटे पुलावरून वाहतूक सुरू असताना इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग व नागपूर-मुंबई रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल कोसळला. रस्ता खचायला सुरवात झाली तसे वाहनचालक थांबले. पाहता पाहता रस्त्याचा एक मोठा भाग खचून केला आणि पुलावरील वाहतूक बंद झाली. हा उड्डाणपूल मनमाड शहराच्या उत्तर-दक्षिण दोन भागांना जोडतो. या पुलावरून इंदूर-पुणे-येवला-कोपरगाव, नगर- शिर्डी- पुणे-सोलापूर-बेंगळुरू, मराठवाडा, विदर्भ आणि कर्नाटकसह आंध्र प्रदेशकडे वाहने जातात. मनमाडनजीक इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांचे इंधन टँकर शिवाय भारतीय अन्न महामंडळातून अन्नधान्य वाहतूक करणारे ट्रक अशी प्रचंड वाहतूक या पुलावरून होते.
या घटनेमुळे या सर्व वाहतुकीला फटका बसला आहे. इंदूर-पुणे महामार्गावरील पुणेमार्गे येणारी वाहतूक येवला येथून, तर इंदूरमार्गे येणारी वाहतूक मालेगाव येथून वळवण्यात आली आहे. यामुळे वाहनचालक व प्रवाशांना ५० किलोमीटरचा फेरा वाढला. परिणामी त्यांच्या प्रवासाच्या निर्धारित वेळेत दीड तास विलंब होत आहे.
('टेंडरनामा'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पुणे-इंदूर महामार्गावरील नवीन वाहतूक मार्ग धुळे ते नगर- मनमाडमार्गे होणारी वाहतूक मालेगाव, चांदवड, लासलगाव, येवलामार्गे जाणार आहे. अहमदनगर ते मालेगाव व धुळ्याकडे जाणारी वाहतूक येवला-विंचूर- लासलगाव-चांदवड-मालेगाव मार्गे जाणार आहे. तसेच पुणे, सोलापूर, नगरकडे जाणाऱ्या बसेससाठी नांदगावहून पर्यायी मार्ग दिला आहे. तसेच मालेगावकडून अहमदनगर, पुणे मार्गाकडे जाणाऱ्या बसेस नांदगावमार्गे येवल्याहून रवाना केल्या जात आहेत.
जबाबदार कोण?
पुणे इंदूर हा महामार्ग आधी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. दरम्यान १० वर्षांपासून तो एमएमकेपीएल या टोल कंपनीकडे बीओटी तत्त्वावर हस्तांतरित करण्यात आला. या कंपनीकडे त्याची देखभालीची जबाबदारी २०२५ पर्यंत त्यांच्याकडेच आहे. आता करार संपण्यास अवघे दीड-दोन वर्षे राहिल्याने देखभालीकडे कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित टोल कंपनी घटनेबद्दल एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे वेळेवर पुलाची दुरुस्ती न करण्यास जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.