नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील पेठरोडच्या कॉंक्रिटीकरणासाठी स्मार्ट सिटी कंपनीने ७२ कोटी रुपये देण्याची आमदार ॲड. राहुल ढिकले यांची मागणी स्मार्ट सिटी कंपनीने फेटाळून लावणे. तसेच त्यानंतर महापालिकेने या रस्त्याच्या डागडुजीसाठी दोन कोटींची तरतूद केल्यानंतर बांधकाम विभागाने विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून टेंडर प्रक्रिया राबवली. पेठरोडच्या दुरुस्तीचे काम आता सुरू झाले असले तरी या सगळ्या प्रकारांमध्ये कालापव्यय होऊन पेठरोड परिसरातील नागरिकांना या खड्डयांमध्ये हरवलेल्या रस्त्यावरून ये जा करताना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. यामुळे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात याटेंडर प्रक्रियेबाबत व महापालिकेच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला आहे. यामुळे मागील वर्षभरापासून चर्चेत असलेला पेठरोड आता विधानसभेतही गाजणार असल्याचे दिसत आहे.
पेठकडून नाशिक शहरात प्रवेश करताना राष्ट्रीय महामार्ग ८४८ वरील पेठफाटा ते तवली फाटा या दरम्यान जवळपाससाडेचार किलोमीटरच्या रस्त्याची अनेक वर्षांपासून चाळण झाली आहे. त्यातच या रस्त्याचे रुंदीकरण करताना वृक्ष तसेच राहिल्याने ते रस्त्याच्या मध्यभागी आल्याने त्यावर अपघातही होत असतात. मागील वर्षी सलग तीन महिने झालेल्या पावसामुळे या रस्त्याची आणखी दुरवस्था झाल्याने पेठरोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, यासाठी परिसरातील नागरिकांनी रस्तारोका आंदोलनही केले. याची दखल घेऊन आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून रस्ता करण्यात यावा, असा प्रस्ताव स्मार्ट सिटी कंपनीसमोर दिला. स्मार्ट सिटी कंपनीने त्यासाठी महापालिकेच्या महासभेची मान्यता लागेल, असे सांगितले.
आमदार ढिकले यांनी प्रशासकांकडे पाठपुरावा करून साडेचार किलोमीटरचे पेठरोडचे कॉंक्रिटीकरण स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून करण्याचा ठराव दिला. मात्र, त्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीची मुदत मार्च २०२३ पर्यंत असून तोपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नवीन कामे प्रस्तावित करण्यास परवानगी नसल्याची उपरती स्मार्टसिटी कंपनीला झाली. त्यातून या मार्गाचे कॉंक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव बारगळला. दरम्यानच्या काळात महापालिकेच्या बांधकाम विभागाने या साडेचार किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला होता.
नवीन रस्ता होत नसल्याचे बघून महापालिकेने या रस्त्या दुरुस्तीच्या कामाची टेंडर प्रक्रिया राबवून एक कोटी ८८ लाख रुपये रकमेचे टेंडरही मंजूर केले. यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून टेंडर प्रक्रिया राबवल्याचा आरोप आमदार ढिकले यांनी केला आहे. मागील वर्षी स्थानिक माजी नगरसेवक अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी महापालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रस्ता तयार होईपर्यंत महापालिकेच्या माध्यमातून या भागात दररोज दोन याप्रमाणे धुळीच्या रस्त्यावर टँकरद्वारे पाण्याची फवारणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या, पण त्याचीही अंमलबजावणी झाली नाही.
महापालिकेने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी रस्ता कामाच्या काम वाटपासून ते नागरिकांच्या आंदोलनापर्यंत झालेल्या प्रकारांबाबत विधानसभेत वाचा फोडली जाणार आहे. तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी पेठ रोडची कायमस्वरुपी दुरुस्ती होणे गरजेचे आहे. महापालिका अन्यत्र निधी खर्च करते. परंतु, रस्ते, पाणी यासारख्या महत्त्वाच्या कामावर नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ का आली? तसेच सध्याचे काम कोणत्या निकषावर दिले, याची माहिती होणे गरजेचे आहे, असे आमदार राहुल ढिकले यांचे म्हणणे आहे.