नाशिक (Nashik) : कोरोनाच्या (Covid 19) पहिल्या लाटेत सेवाभावी वृत्तीतून होमिओपॅथी आर्सेनिक अल्बम- ३० गोळ्या वाटप होत असल्याने त्यावेळी भाजपच्या (BJP) या मोहिमेचे कौतुक झाले. परंतु, आता गोळ्या पुरविणाऱ्या दोन्ही संस्थांनी गोळ्या वाटपाचे चौदा लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी महापालिकेकडे (Nashik Municipal Corporation) तगादा लावताना दबावाचे राजकारण सुरू झाल्याने भाजपच्या सेवावृत्तीत उतरलेले अर्थकारण चांगलेच चर्चेत आले आहे.
कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी अशा विविध पॅथीमध्ये स्पर्धा लागली. त्यात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-३० या गोळ्यांचा पर्याय काही संस्थांच्या माध्यमातून पुढे आणला गेला. आयुष मंत्रालयाचा हवाला देत या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
भाजप नगरसेवकांकडूनदेखील मतदारांना गोळ्या वाटल्या गेल्या. महापालिकेच्या माध्यमातून आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप झाले. गोळ्यांचे वाटप करताना सेवाभावी वृत्तीतून वाटप होत असल्याचे सांगितले गेले. परंतु, आता इंदिरानगरमधील परिवार मित्रमंडळ व नाशिक रोड येथील श्री साई संस्था या दोन स्वयंसेवी संस्थानी पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही लाटांमध्ये प्रत्येकी सात असे एकूण चौदा लाख रुपये गोळ्यांसाठी खर्च झाल्याचा दावा करत वैद्यकीय विभागाकडे बिलासाठी तगादा लावला आहे.
कार्यारंभ आदेश नसताना वाटप
वास्तविक कुठल्याही कामाला परवानगी देताना महापालिकेकडून कार्यारंभ आदेश दिले जातात. आयुक्तांच्या अधिकारातील खरेदी किंवा काम असले तरी त्यासाठी अशा प्रकारचे कार्यारंभ आदेश असतात. परंतु, कार्यारंभ आदेश नसताना दोन्ही संस्थाकडून गोळ्या वाटपाचे बिल सादर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे बिल वसुलीसाठी राजकीय दबाव टाकला जात असून, त्यासाठी नाशिक रोड व इंदिरानगरच्या भाजपच्या नगरसेवकांनी लेटरहेडवर बिल देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अशाप्रकारे बिल देता येत नसल्याने आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.