नाशिक (Nashik) : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग (Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg) शिर्डीपर्यंत वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर या महामर्गाावरून आठवडाभरात साठ हजार वाहने धावल्याचे रस्ते विकास महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे. या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी दरम्यानचे १०० किलोमीटर अंतर कमी होऊन आठवडाभरात जवळपास ५० कोटी रुपयांच्या इंधनाची बचत झाली आहे. शिवाय या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या प्रवासात सहा तासांची बचत झाली आहे. दरम्यान आठवडाभरात या महामार्गावरून ४३ हजार वाहने धावली आहेत.
समृद्धी महामार्गाचे मुंबई ते नागपूर अंतर ७१० किलोमीटर असून, त्यापैकी ५७० किलोमीटरचा नागपूर ते शिर्डी दप्पा वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या महामार्गावरून आठवडाभरात बहुतांश वाहने शिर्डी, औरंगाबाद व जालन्यापर्यंत धावली. औरंगाबाद, जालना येथूनही शिर्डीचे अंतर शंभर किलोमीटरने कमी झाले. या महामार्गावरून दिवसाला सव्वासहा हजार वाहने धावत असल्याचे, रस्ते विकास महामंडळाकडील आकडेवारीतून समोर आले आहे. या महामार्गामुळे शंभर किलोमीटर अंतर कमी झाल्याने या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची ५० कोटी रुपयांची इंधन बचत झाली आहे.
शिर्डी ते नागपूरदरम्यानच्या पूर्वीच्या प्रवासाला बारा तास लागायचे. ही वेळ 'समृद्धी'मुळे आता सहा तासांवर आली आहे. समृद्धी महामार्गावरून जाण्यासाठी शिर्डी ते नागपूर या टप्प्यातील अंतरात 'लाइट वेट' आणि कार प्रकारातील वाहनासाठी एकेरी प्रवासासाठी जवळपास ९०० रुपये टोल द्यावा लागत आहे. मुंबईपर्यंत थेट प्रवास करायचा झालास ही रक्कम बाराशे रुपये होणार आहे.
अशी आहे टोलआकारणी
समृद्धी महामार्गावर महामार्गावर लहान वाहनांना एक रुपये ६५ पैसे प्रत्येक किलोमीटरला टोल आकारला जाईल. जड वाहनांना हलक्या वाहनांपेक्षा तीनपट अधिक टोल भरावा लागेल. हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी (मिनी बस) दोन रुपये ७९ पैसे, बस- ट्रकसाठी पाच रुपये ८५ पैसे, अवजड यंत्रसामग्रीसाठी नऊ रुपये १८ पैसे, अतिअवजड वाहनासाठी ११ रुपये १७ पैसे प्रत्येक किलोमीटरला टोलदर निश्चित करण्यात आला आहे.