नाशिक (Nashik) : नाशिक जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित मनमाड येथील नवीन औद्योगिक वसाहतीसाठी १७७ हेक्टरवर भूसंपादन करण्यासाठी नांदगाव तहसीलदारांनी यासाठी अनकवाडे व सटाणे येथील सरकारी व खासगी जमीन यासाठी भूसंपादित करावी लागणार असल्याचा अहवाल महाराष्ट्र राज्य औद्यागिक विकास महामंडळाला जूनमध्ये पाठवलेला आहे.
या भूसंपदानासाठी उच्चस्तरीय समितीच्या मंजुरीची प्रतीक्षा असून दरम्यान नाशिक दौर्यावर आलेले राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या आठवड्यात या औद्योगिक वसाहतीला मान्यता दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे मनमाड येथील बहुप्रतीक्षित औद्योगिक वसाहत मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनमाड हे नांदगाव तालुक्यातील प्रमुख जंक्शन रेल्वेस्थानक आहे. मनमाड जवळच इंधनकंपन्यांचे विस्तृत जाळे, प्रमुख रेल्वे जंक्शन व रस्ता वाहतुकीचे केंद्र, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे धान्य साठवण केंद्र,पोषक हवामान व मोठ्या प्रमाणात शासकीय जमीन मनमाडला उपलब्ध आहे. मात्र, मनमाड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्यामुळे उद्योगासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने येथे औद्योगिक वसाहतीच्या घोषणा प्रत्यक्षात कधीही येऊ शकल्या नव्हत्या. दरम्यान आमदार सुहास कांद यांनी मनमाड शहराची पाण्याची गरज भागवण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील करंजवण धरणातून थेट जलवाहिनी मंजूर केली असून या योजनेचे काम सध्या सुरू आहे. यामुळे पुढील वर्षभरात ही योजना पूर्ण झाल्यानंतर मनमाडचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे यापूर्वी मनमाडसाठी पालखेड धरणातील आरक्षण आता मनमाडच्या एमआडीसीसाठी आरक्षित करण्यात आला असून त्याप्रमाणे पाणी उपलब्धतेचा दाखला मिळाला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने मनमाड जवळ एमआयडीसी उभारण्यासाठी हिरवा कंदिल दिला आहे.
त्यानुसार नांदगाव तहसील कार्यालयाने मनमाड जवळ सटाणे व अनकवाडे शिवारात एमआयडीसी उभारण्यासाठी जमिनीचे सर्वेक्षण करून तो अहवाल औद्योगिक विकास महामंडळाला पाठवला आहे. तहसीलदारांनी पाठवलेल्या अहवालानुसार यावर्षी फेब्रुवारीमध्ये नांदगाव तालुक्यातील सटाणे येथील २६८ हेक्टर क्षेत्राची तसेच अनकवाडे शिवारातील ९२ हेक्टर क्षेत्राची भूपाहणी केली. त्यापैकी या दोन्ही गावांमधील १७७ हेक्टर क्षेत्र एमआयडीसीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. या क्षेत्रापैकी दोन्ही गावांच्या शिवारामधील ६.२५ हेक्टर क्षेत्र सरकारी असून उर्वरित क्षेत्र खासगी आहे. या १७७ हेक्टर क्षेत्राला उद्योग मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीची या आठवड्यात मंजुरी देण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिक येथे जाहीर केल्यामुळे मनमाड एमआयडीच्या मान्यतेची घोषणा लवकरच होणार असल्याचे बोलले जात आहे. या मंजुरीनंतर मनमाडच्या एमआयडीसीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.