नाशिक (Nashik) : नवीन इमारतीचे बांधकाम करणे, तसेच इमारतीच्या पुर्नविकासामुळे हवेचे प्रदूषण वाढते. यामुळे सर्वच प्रकारच्या बांधकामांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने बांधकामाबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमाच्या (एन कॅप) अंतर्गत एक एकरपेक्षा मोठ्या व ५० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींच्या बांधकाम परिघाभोवती २५ फूट उंचीचे पत्रे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. छोट्या बांधकामांना हिरवी आच्छादने व पाडलेल्या इमारतींना ताडपत्रीचा वापर करणे बंधनकारक केले असून त्याप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी अँटी स्मॉग गनचा वापर करणे अनिवार्य आहे. या नियमांचे पालन होते किंवा नाही, यासाठी महापालिका आयुक्त तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाला विशेष पथके तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत राज्यातील शहरी भागातील प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांना यासाठी स्वतंत्र निधी दिला जातो. त्यातून प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक शहरांमध्ये या निधीचा खर्च होत नसल्याचे समोर आले आहे.
तसेच खर्च करताना प्रदूषण कमी करण्याच्या नावाखाली संबंध नसलेल्या उपाययोजनांवर खर्च केला जात असल्याचे दिसत आहे. यामुळे निधी खर्च होऊनही प्रदूषणात घट होत नाही. यामुळे राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने बांधकामामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.
नियमांची अंमलबजावणी झाली नाही तर कारवाई देखील निश्चित केली आहे. या नियमावलीमुळे बांधकाम खर्चात वाढ होणार असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. राज्याचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी हवेचे प्रदूषण कमी करण्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाला विशेष पथके तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. पथकासाठी विभागीय पातळीवरच्या अधिकाऱ्यांना अधिकार दिले जाणार आहेत. त्यात काम थांबववणे, नोटीस बजावणे, बांधकामाचे स्थळ सील करणे यासारखी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी
- शहरात बांधकाम साहित्य विल्हेवाट प्रकल्प बंधनकारक
- बांधकाम कामगाराना मुखवटे, गॉगल, हेल्मेट आवश्यक
- पूल, उड्डाणपूलासाठी किमान २० फुटांचे बॅरिकेडिंग आवश्यक
- बांधकामाच्या ठिकाणी वायू प्रदूषण मॉनिटर्स आवश्यक
- बांधकाम परिसर हिरव्या कापडाने बंदिस्त करणे बंधनकारक
- बांधकामाच्या ठिकाणी अँटी-स्मॉग गनचा वापर करणे
- जुन्या इमारतीचे पाडकाम करताना पाणी फवारणी आवश्यक
- पाडलेल्या बांधकामांना ताडपत्री, कापडाने बंदीस्त करावे
- बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने बंदिस्त असावीत.