नाशिक (Nashik) : अदानी उद्योग समूहाने (Adani Group) गुजरातमधील अहमदाबाद येथील रजिस्ट्रार ऑफ कंपनीज कार्यालयात अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेड या कंपनीची नोंदणी केली आहे. यामुळे लवकरच नाशिकमधील ग्राहकांना महावितरणसोबत अदानींच्या विजेचाही पर्याय मिळू शकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अदानी उद्योग समूह हा आक्रमक पद्धतीने व्यवसायात उतरून विस्तार करीत असतो. त्यामुळे नाशिकमध्ये वीज वितरणासाठी त्यांनी कंपनीची स्थापना केली असून आता लवकरच वीज नियामक आयोगाकडे याबाबत मागणी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या मुंबईत टाटा, अदाणी, रिलायन्स आदी कंपन्यांकडून वीज पुरवली जाते. त्याचप्रमाणे राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्येही खासगी कंपन्यांच्या माध्यमातून वीज वितरण करण्याबाबत राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अदानी उद्योग समूहाने अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमीटेड नावाच्या कंपनीची नोंदणीही मागील आठवड्यात केली आहे. राज्य सरकारने वीज वितरणाचे काम खासगी कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिकमध्ये वीज वितरण करण्याचे काम मिळवण्यासाठी अदानी उद्योग समूहाने चालवलेली ही पूर्वतयारी समजली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार केवळ शहरी भागातील वीज वितरणाचे खासगीकरण करण्याच्या विचारात असून ग्रामीण भागातील वीजवितरण महावितरण या कंपनीकडेच राहण्याची शक्यता आहे. यामुळे अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेड या कंपनीकडे प्रामुख्याने नाशिक शहरात वीज वितरण करण्याचे काम दिले जाण्याची शक्यता आहे. यामुळे शहरातील ग्राहकांना महावितरण आणि अदानी असे दोन पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहे.
अदानी उद्योग समूहाने अहमदाबाद येथील रजिस्ट्रार ऑफ कंपनीज यांच्याकडे १६ मार्चला अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेड या कंपनीची नोंदणी केली असून या कंपनीचा प्रत्यक्ष व्यवसाय अद्याप सुरू होणार असल्याचे या नोंदणीत स्पष्ट करण्यात आले आहे. वीज नियामक आयोगाने यापूर्वीच वीज वितरणाचे काम खासगी कंपन्यांकडे देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार मुंबई परिसरातील ग्राहकांना खासगी कंपन्यांचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. या कंपन्यांनी आता आता इतर शहरांमध्येदेखील वीज वितरणाचा परवाना मिळावा, अशी मागणी वीज नियामक आयोगाकडे केली आहे. नियमानुसार कुणीही वीज वितरणाचा परवाना मिळवू शकतो. त्यामुळे महावितरणकडून यावर कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नाही. या कंपन्यांनी महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये परवाना मिळावा, यासाठी दावा केला होता. त्यामध्ये अदानी कंपनीने नाशिक शहरासाठी वीज वितरणाची परवानगी मागण्यासाठीच या कंपनीची नोंदणी केली आहे.
सध्या नाशिककरांना महावितरण कंपनीकडून विजेचा पुरवठा केला जातो. जर अदानी समूहाला वीज वितरणाचा परवाना मिळाला तर नाशिकमधील काही भागात अदानी ग्राहकांना वीज पुरवठा करू शकतील. तसे झाल्यास ग्राहकांना महावितरणबरोबरच अदानीचा आणखी एक पर्याय मिळेल. अर्थात अदानी उद्योग समूह कधीपासून नाशिकमधील वीज वितरण व्यवसायात उतरणार आहे, याबाबत अधिकृतपणे कोणीही माहिती देण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. मात्र, याबाबत पुढच्या काही महिन्यांमध्ये हालचाली दिसू लागतील, अशी चर्चा आहे.