नाशिक (Nashik) : काम केल्याचा पूर्वानुभव असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून तसेच सरकारी शिक्क्यांचा गैरवापर करीत नाशिक जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाची ९ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या सॅमसन इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाला विविध साहित्य पुरवठा करण्यासाठी या बनावट कागदपत्रांचा वापर केल्यामुळे जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रारी दिली आहे. या कंपनीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयास जिल्हा नियोजन समिती तसेच राज्याच्या युवक व क्रीडा मंत्रालयाकडून दरवर्षी अर्थसंकल्पात मंजूर केल्याप्रमाणे निधी दिला जातो. या निधीतून शाळा, ग्रामपंचायती तसेच विविध क्रीडा संघटना यांना क्रीडांगण उभारणे, क्रीडा साहित्य वितरित करणे यासाठी हा निधी वापरला जातो या कार्यालयाकडून क्रीडांगण बांधण्याची जबाबदारी इतर कार्यान्वयीन यंत्रणेकडे सोपवली जाते, तर क्रीडा साहित्य खरेदीसाठी या कार्यालयाकडून टेंडर प्रक्रिया राबवली जाते.
क्रीडा सहित्य खरेदीच्या या टेंडर प्रक्रियेत पुरवठा ठेका मिळावा यासाठी सॅमसन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या प्रोप्रायटर कंपनीने कामाचा पूर्वानुभव नसताना जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील विविध साहित्य पुरवठ्याचा ठेका, मिळविण्यासाठी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील शासकीय शिक्क्याचा गैरवापर केला. तसेच पूर्वानुभवाच्या बनावट प्रमाणपत्राचा वापर करून तब्बल ९ कोटी २३ लाख रुपयांचे टेंडर मिळवण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. यातून जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाची फसवणूक झाल्याने जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात २३ मार्च २०२३ ते १ एप्रिल २०२३ या कालावधीत घडलेला हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून देत संशयित कंपनीविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सॅमसन इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीच्या प्रोप्रायटर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
टेंडर प्रक्रियेत अनेक ठेकदारांकडून बनावट कागदपत्र सादर केली जातात. तसेच ठेकेदारीचा परवाना मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर करण्याचे प्रकार नवीन नाही. मात्र, बनावट कागदपत्र पुरवले म्हणून अधिकाऱ्यांनी थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा प्रकार घडल्यामुळे ठेकेदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.