नाशिक (Nasik) : राजस्थान सरकारच्या (Rajasthan Government) पर्यटन विभागाच्या ‘ई-टॉयलेट’ (E-Toilet) जाहिरातीच्या ई-टेंडरींगच्या (E Tendering) कामात गुंतवणूक केल्यास कोट्यावधीचा नफा होऊ शकतो, असे आमिष दाखवून नाशिकमधील युवकासह व्यावसायिकांना तब्बल सहा कोटी ८० लाख रुपयांना गंडवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुजरातमधील १५ संशयितांविरुद्ध येथील गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१८ ते २०२० दरम्यान ही घटना घडली. सुशिल भालचंद्र पाटील (वय ३३, रा. ओमकार बंगला, गितांजली को-ऑप सोसायटी, वाघ गुरुजी शाळेसमोर, पंपींग स्टेशन, गंगापूर रोड) यांना या प्रकरणात गंडवण्यात आले आहे. सुशिल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयितांनी संगनमत करून विश्वास संपादन केला. राजस्थान सरकारच्या पर्यटन विभागाच्या ई-टॉयलेटच्या जाहिरातींचे ई-टेंडरचे संपूर्ण राज्याचे कामकाज समाविष्ट असल्याचे सांगून, त्यात गुंतवणूक केल्यास कोट्यावधीचा नफा मिळू शकतो, असे खोटे आश्वासन देत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सुशिल पाटील व संंबंधित व्यावसायिकांकडून २०१८ ते २०२० दरम्यान तीन कोटी ९३ लाख ५४ हजार ७८८ रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करून घेतले. तसेच उर्वरीत रक्कम रोख घेत गंडवले.
हे आहेत संशयीत...
सुशिल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सचिन पुरुषोत्तमभाई वेलेरा (रा. भावकुंज सोसायटी, अहमदाबाद, गुजरात), वैभव गहलोत (सरदारपुरा, जोधपूर), किशन कांतेलिया, सरदारसिंग चौहान, ‘नीडल क्राफ्ट’चा अधिकृत व्यक्ती, प्रविणसिंग चौहान, सुहास सुरेंद्रभाई माकवाल, निरवभाई महेशभाई विर्माभट, बिश्वरंजन मोहंती, राजबिरसिंग शेखावत, प्रग्येशकुमार विनोदचंद्र प्रकाश, संजयकुमार देसाई, सावनकुमार पारनेर, रिशिता शहा, विराज पांचाल यांच्याविरुद्ध कलम ४२०, ४०६, ४६८, ४७१, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.