नाशिक (Nashik) : नाशिकरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयास (Currency Note Press) नेपाळच्या नोटा छापण्याचे कंत्राट मिळाले आहे. त्यामुळे लवकरच येथे नेपाळच्या एक हजार रुपयांच्या ४३० कोटी नोटांची छपाई सुरू होणार आहे. याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेने पाच हजार कोटी नोटा छापण्याची ऑर्डर दिली आहे. यात वीस, पन्नास, शंभर, दोनशे, पाचशे रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.
देशात ऑनलाइन व्यवहार, यूपीआय, डेबिट कार्डचा वापर वाढत आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ई रुपया लाँच केला आहे. यामुळे दिवसेंदिवस कागदी चलनाचा वापर कमी होऊ लागला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या देशातील नोट प्रेसमध्ये इतर देशांच्या नोटा छपाई करण्यासाठी कामे मिळवण्यास सुरवात केली आहे. जगभरात आजही 50 ते 60 देश त्यांचे चलन बाहेरून छापून घेतात. यामुळे एक्सपोर्ट पॉलिसीच्या माध्यमातून चलार्थपत्र मुद्रणालयात स्वतंत्र एक्सपोर्ट विभाग बनवण्यात आला आहे.
नाशिकरोड चलार्थपत्र मुद्रणालयात यापूर्वी 2005 मध्ये नेपाळच्या नोटा छापल्या होत्या. यंदा पुन्हा नेपाळ सरकारने एक हजार रुपयांच्या 430 कोटी नोटा छापण्याचे काम दिले आहे. हे काम वेगात पूर्ण होण्यासाठी जपानी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहेत. रात्रंदिवस मेहनत करून हे काम सुरू असल्याची माहिती प्रेस मजदूर संघातर्फे देण्यात आली.
98 वर्षांचा इतिहास
नाशिक रोड येथे 1924 मध्ये प्रतिभूती मुद्रणालय स्थापन करण्यात आले. तेव्हापासून पासपोर्ट, धनादेश, मुद्रांक, टपाल तिकीटे, पोस्ट कार्ड यांची छपाई सुरू झाली. अलीकडे निवडणूक आयोगाचे इलेक्शन सीलची छपाई होते. 1938 पासून येथे नोटा छपाई सुरू झाली. नोटा छपाईचा व्याप वाढल्यानंतर 1962 मध्ये स्वतंत्र करन्सी नोट प्रेस सुरू झाले. या नोट प्रेसमधून यापूर्वी चीन, पाकिस्तान, पूर्व आफ्रिका, इराण, भूतान, श्रीलंका, बांगलादेश, इराक, नेपाळ यांच्या नोटांची छपाई करण्यात आली आहे.
नेपाळच्या चलनाबरोबरच भारतीय रिझर्व्ह बँकेने या आर्थिक वर्षासाठी पाच हजार कोटी नोटा छापण्याचे काम दिले असून त्यात वीस, पन्नास, शंभर, दोनशे, पाचशे रुपयांचा समावेश आहे.