नाशिक (Nashik) : बहुप्रतीक्षित नमामि गोदा प्रकल्पाचा अहवाल संबंधित सल्लागार कंपनीने महापालिकेला सादर केला आहे. या प्रकल्पाची किंमत २७८० कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पासाठी १८०० कोटी रुपये देण्यास तत्वता मंजुरी दिली असताना त्याची किंमत जवळपास हजार कोटी रुपयांनी वाढली आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरालगतची गोदावरी व तिच्या उपनद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारेन नमामि गोदा हा प्रकल्प राबवण्यास परवानगी दिली आहे. गोदावरीच्या काठावर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत असतो. मात्र, नाशिक शहरात गोदावरीच्या पात्रात सोडले जाणारे सांडपाणी, मलनिस्सारण केंद्रांमध्ये मलजल शुद्ध न करताच गोदापात्रात सोडले जाते. तसेच शहरामधून वाहणार्या गोदावरीच्या उपनद्यांना गटारीच स्वरुप आले असल्याचे गोदावरी प्रचंड प्रमाणात प्रदूषित झाली आहे. यामुळे वाराणशी येथे नमामि गंगा प्रकल्पाच्या धर्तीवर नाशिक येथेही नमामि गोदा प्रकल्प राबवण्यात यावा, अशी मागणी महापालिकेकडून केंद्री जलशक्ती मंत्रालयाकडे मांडण्यात आली होती.
त्यानुसार त्यांनी १८०० कोटी रुपये देण्याची तत्वता तयारी दर्शवली होती. तसेच त्या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान महापालिकेच्यावतीने सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात बराच काळ केल्यानंतर अखेर अल्मोंडस नांगिया अॅन्ड कंपनीची यासाठी नियुक्ती करण्यात आली. या कंपनीने नमामि गोदाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करत महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे प्रारूप आराखडा सादर करण्यात आले आहे. यात नमामि गोदा प्रकल्पाचा खर्च २ हजार ७८० कोटींपर्यंत गेला आहे. या प्रकल्पाचा हा केवळ प्रारुप आराखडा आहे. यानंतर या प्रकल्पाशी संबधित सर्व घटकांची बैठक होणार आहे. त्यात करण्यात आलेल्या सूचनांचा या प्रकल्पात समावेश करण्यात येणार आहे. यामुळे अंतिम अहवालात या प्रकल्पाच्या किंमतीत आणखी वाढ हेण्याची शक्यता आहे.
असा आहे नमामि गोदा प्रकल्प
नमामि गोदा प्रकल्पात गोदावरीची प्रदुषणातून मुक्ती करण्यासाठी नदीत मिळसणारे सांडपाणी रोखण्यात येणार आहे. यासाठी भूमिगत गटारीचे नवीन जाळे तयार करण्याबरोबरच जुन्या गटारींची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच शहरातील नव वसाहतींच्या भागात मलजल वाहिन्यांचे नवीन जाळे टाकण्यात येणार असून मलनिस्सारण केंद्रांची क्षमता वाढवण्यात येणार आहे. या शिवाय मखमलाबाद, कामटवाडे येथे नवीन मलनिस्सारण केंद्र उभारण्यात येणार आहे. गोदावरीचे प्रदूषण कमी करण्याबरोबरच गोदावरीच्या सौंदर्यीकरणावर भर दिला जाणार आहे. यासाठी गोदाघाट विकसित करण्यात येणार आहेत.
असा होणार खर्च
मलनिससारण केंद्रांचे अद्ययावतीकरण : ३९९ कोटी
नवीन मलवाहिकांचे जाळे निर्माण करणे : ९२७ कोटी
नवीन मलनिस्सारण केंद्र उभारणे : ६२२ कोटी
गोदावरी घाट व सौंदर्यकरण : ८३२ कोटी