नाशिक (Nashik) : राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाने या आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्यातील प्राचित व ऐतिहासिक वास्तुंचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक शहर व जिल्ह्यातील १३ वास्तुंचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहे.
या ठिकाणांची दुरुस्ती करण्यासाठी पुरातत्व विभागाने वास्तुविशारदांकडून प्रस्ताव मागवले आहेत. या १३ वास्तुंमध्ये प्रामुख्याने भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर वाडा, साल्हेर-मुल्हेर किल्ला, अंकाई किल्ला यांचा समावेश आहे.
राज्य सरकारने यावर्षापासून जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण योजनेतून ३ टक्के निधी हा पुरातत्व विभागाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून किल्ले,ऐतिहासिक व प्राचिन वास्तुंचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्हा नियोजन समितीला या आर्थिक वर्षात सर्वसाधारण योजनेतून ६८० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या ३ टक्के म्हणजे जवळपास २०.४० कोटी रुपये निधी पुरातत्व विभागाला प्राप्त होणार आहे. पुरातत्व विभागाला प्रथमच एवढ्या मोठ्याप्रमाणात जिल्हा वार्षिक योजनेतून निधी प्राप्त होणार आहे.
यामुळे पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक कार्यालयाकडून जिल्ह्यातील १३ स्मारकांच्या जतन व दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मारकांच्या जतनासाठी विभागाच्या पॅनलमध्ये नोंदणी असलेल्या व अनुभवी वास्तुविशारदांकडून प्रस्तावांसाठी दरपत्रक मागवले आहेत. या दरपत्रकानुसार वास्तुविशारदांची नियुक्ती करून संबंधित स्मारकांचे जतन व दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
किल्ले दुरुस्तीला निधी
नाशिक जिल्ह्यात किल्ल्यांची संख्या मोठी आहे. मात्र, या किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याचे तेथील प्राचिन बांधकामाची वाताहत होत आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता जिल्हा नियोजन समितीच्या तीन टक्के निधीतून किल्ले जतन व दुरुस्तीला निधी मिळणार असल्याने पुरातत्व विभागाने जिल्ह्यातील साल्हेर, मुल्हेर अंकाई या तीन किल्ल्यांचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या स्मारकांची होणार दुरुस्ती
सरकारवाडा, सुंदर नारायण मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर वाडा (भगूर), तातोबा मंदिर (ओढा), नारोशंकर मंदिर, महादेव मंदिर (देवळाणा), मुल्हेर किल्ला (मुल्हेर), साल्हेर किल्ला (साल्हेर), होळकरवाडा (चांदवड), विष्णू मंदिर (धोडांबे), वैजेश्वर मंदिर (वावी), मुक्तेश्वर महादेव मंदिर (सिन्नर), अंकाई किल्ला (येवला).